शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बीडमधल्या परळीत शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुंडे भाऊ-बहिणीतील राजकीय दरीमुळे हा कार्यक्रम आधीच चर्चेत आला होता. पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का? इथपासून कार्यक्रमातील राजकीय टोलेबाजीपर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा पाहायला मिळाली. अखेर हा कार्यक्रम आज परळीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणेच पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच केलेल्या भाषणातून पंकजा मुंडे यांनी यावेळी केलेल्या मिश्किल टिप्पणीवर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला!
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी सरकारमधील सर्वोच्च स्थानी असणाऱ्या तिन्ही व्यक्ती हजर राहिल्यामुळे कार्यक्रमात ही नेतेमंडळी नेमकी कोणती भूमिका मांडणार? याची उत्सुकता त्यांच्या नेतेमंडळींना व कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळालाही लागलेली होती. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंबाबत केलेल्या विधानामुळे व्यासपीठावरील मान्यवरांच्या चेहऱ्यावरही हास्याची लकेर उमटली.
“आज मला फार उकडत होतं”
“मी जेव्हा आज मंचाकडे बघत होते, तेव्हा मला फार गरम होत होतं. मला वाटलं आत्ता डिसेंबरच्या महिन्यात एवढं गरम का होत आहे? मग माझ्या लक्षात आलं की शिंदे, पवार आणि फडणवीस हे तिघंही परळीच्या या एका मंचावर आले आहेत. पण त्याहीपेक्षा इथे थोडा पारा जास्तच वाढलाय. कारण धनंजय मुंडे व पंकजा मुंडेही एकाच मंचावर आलेले आहेत”, अशी कोपरखळी यावेळी पंकजा मुंडेंनी मारली.
“…तोपर्यंत फेटा बांधणार नाही”, पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये व्यक्त केला निर्धार
“मी धनंजयचं अभिनंदन करते, कारण…”
“मला माध्यमांनी विचारलं की ‘ताई या कार्यक्रमात तुम्ही आलात हे प्रमुख आकर्षण आहे का?’ मी म्हटलं इथे जे बसले आहेत, त्यांच्याकडे बघता माझ्याकडे संवैधानिक अशी कोणतीही भूमिका नाही. पण जिल्ह्याची पाच वर्षं पालकमंत्री म्हणून काम करत असताना मनापासून इच्छा होती की वैद्यनाथ तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा. फडणवीस मुख्यमंत्री असताना या योजनेचं आम्ही बीजावरोपण केलं. पण काही कारणास्तव ती योजना पुढे जाऊ शकली नाही. मी धनंजयचं अभिनंदन करते की आता ही योजना पुढे जाईल. त्यासाठी २८६ कोटी रुपयांचा निधी आहे. मी एवढंच सांगेन की अत्यंत चांगलं काम या माध्यमातून व्हावं”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
“माझी मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे. आता भाजपाचं तिनही राज्यांमध्ये सरकार आलं आहे. त्या राज्यांमध्ये काही योजना आहेत. मध्य प्रदेशमधील लाडली बेहेना, तिथल्या ओबीसी आरक्षणाचाही विषय त्यांनी मार्गी लावला. हे प्रश्न आपण आपल्याकडेही मार्गी लावले, तर सरकारला या लोकांच्या दारापर्यंत यायचीही गरज पडणार नाही. हे लोक दारात येऊन आपल्याला पुन्हा संधी देतील”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.