Pankaja Munde Dasara Melava 2024: राज्यात दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर आज बीडमधील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर भाजपाच्या नेत्या, आमदार पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात कृषीमंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी हिंदीमधून एक कविता म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. “मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू”, असं म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. दरम्यान, यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्याला आपला डाव खेळायचा की नाही?, असं म्हणत वंचितांना, दलितांना त्रास दिला तर हिशेब केल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा पंकजा मुंडे यांनी कोणाचेही नाव न घेता दसरा मेळाव्यातून दिला.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

“मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू”, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्या म्हणाल्या की, “मला गोपीनाथ मुंडे यांनी वारसा दिला. गोपीनाथ मुंडे यांचं भगवान गडावरून शेवटंचं वाक्य होतं की, मला गडावरून दिल्ली आणि मुंबई नाही तर पंकजा मुंडे दिसते. त्यामधून मला त्यांनी एक संदेश दिला. मला जीवनात काही निर्माण करता आलं नाही. पण मी एक भगवान भक्तीगड उभा केला. गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेला शब्द मी पूर्ण करून दाखवला. मला येथील जनता जास्त प्रिय आहे. माझ्यावर ज्यावेळी जीएसटीची रेड पडली होती, त्यावेळी या सर्व लोकांनी १२ कोटी रुपये जमा केले होते. माझ्या निवडणुकीचा निकाल लागला होता, तेव्हा या लोकांनी जीव दिला. येथील सर्व लोकांवर मी माझ्या लेकरांपेक्षा जास्त जीव लावते. मी कुणालाही घाबरत नाही. मी उसतोड कामगारांचे आयुष्य बदलल्याशिवाय शांत बसणार नाही”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचा : “आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार”, मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळाव्यातून मोठा इशारा

‘आपला डाव खेळायचा की नाही?’

“मी दसरा मेळाव्याला दरवर्षी आल्यानंतर तुम्हाला सर्वांना साष्टांग नमस्कार घालते. मी तुम्हाला साष्टांग नमस्कार का घालते? कारण माझ्या वडिलांनी तुमची जबाबदारी माझ्या झोळीत टाकली. मी वियजी झाल्यावर तुम्ही मला मोठा मान दिला. पण माझा पराभव झाल्यानंतरही तुम्ही मला त्याहीपेक्षा जास्त मान दिला. आता तुम्हा सर्वांना मान देण्यासाठी मी प्रत्येक गावागावात आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा की नाही?, या मंचावर अठरा पगड जातीचे लोक आहेत. या ठिकाणी सर्व धर्माचे लोक आले आहेत”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

‘वंचितांना त्रास दिला तर हिशेब करणार’

“तुम्हाला वाटतं का माझा पराभव झाल्यामुळे मी थकले आहे. पण मी सांगते घोडा मैदान लांब नाही. धनजय मुंडे यांना परळीतून आमदार करणारच आहोत. पण राज्यातील कानाकोपऱ्यात आमच्या लोकांना कुठेही त्रास दिला, वंचितांना, पिडीतांना दलितांना गरिबांना त्रास दिला तर त्याचा हिशेब केल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातून दिला आहे.