जिल्हा बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत, असे सांगतानाच बँकेचे थकबाकीदार व कर्जप्रकरणात गुन्हा दाखल असलेली व्यक्ती कोणत्याही वैधानिक पदावर राहता कामा नये, अशा शब्दांत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले.
जिल्हा बँकेचा शेतकरी मेळावा शनिवारी पंकजा मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पार पडला. खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार आर. टी. देशमुख, भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, फुलचंद कराड, रमेश पोकळे, संतोष हांगे, सर्जेराव तांदळे यांच्यासह भाजप पदाधिकारी व बँकेचे संचालक या वेळी उपस्थित होते.
जिल्हा बँकेसंदर्भात झालेले आरोप तथ्यहीन आहेत. ज्या लोकांनी बँकेचे कर्ज बुडवले, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. अशांनी आरोप करावेत याचे वाईट वाटते अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख टाळून हल्ला चढविला. जनतेच्या हिताचे निर्णय घेताना कितीही आरोप झाले तरी घाबरणार नाही, असे सांगून भ्रष्टाचारात बरबटलेल्या, गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांनी काही लोकांना पुढे करून पाठीमागून वार केल्याची टीकाही पंकजा मुंडे यांनी केली.
सदाभाऊ खोत यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेला एकही नेता नाही. परंतु पंकजा मुंडे हे नेतृत्व करू शकतात. मात्र, त्यामुळेच त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. परंतु आरोप झाल्यानंतर मंत्र्यांच्या पाठीमागे घटकपक्षांसह गावागावातील जनता खंबीरपणे उभी राहिल्याचे पहिल्यांदाच दिसले. त्यामुळे पंकजा यांचे नेतृत्व कोणीही थांबवू शकत नाही. शेतकरी संघटना कायम मुंडे यांच्याबरोबर असेल, अशी ग्वाही खोत यांनी दिली. भारतीय जनता पक्षाबरोबर छोटय़ा पक्षांच्या महायुतीची मोट गोपानीथ मुंडे यांनीच बांधली. मात्र, पंकजा मुंडे पुढे आल्या, तर आपले राजकीय दुकान बंद होईल या भीतीने काही लोकांनी पंकजा यांच्यावर खोटे आरोप करून बदनामीचे षड्यंत्र रचले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एखाद्या मंत्र्यावर आरोप झाल्यानंतर भाजपच्या घटक पक्षांसह सर्वसामान्य जनता मंत्र्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिल्याचे चित्र दिसून आले, असेही खोत म्हणाले. खासदार डॉ. मुंडे यांच्यासह आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी प्रास्ताविक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा