परळीत पहिल्यांदाच एका व्यासपीठावर, थेट बोलणे टाळले

बीड : परळीत पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एकमेकांना बोलणे टाळले असले तरी चिमटे काढणे सोडले नाही. मी, एक चांगली विद्यार्थिनी आहे म्हणून वेळेवर आले. दुसरा कार्यक्रमही महत्त्वाचा असल्याने जात आहे, असा टोला पंकजा मुंडे यांनी उशिरा पोहोचलेल्या धनंजय मुंडे यांना लगावला. तर धनंजय यांनी चांगले विद्यार्थी वेळेवर येतात, पण लवकर जातात हे आज कळाले. चांगले कोण, हे गुणपत्रिका आल्यावर कळेल, असा चिमटा काढत विरोधी पक्षानंतर सत्ताधारी उत्तर देत असतात, पण येथे उलटे घडले. कदाचित भविष्याची चाहूल त्यांना लागली असावी, असा प्रतिटोला धनंजय मुंडे यांनी लगावल्याने बहीण-भावाच्या कोपरखळ्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढली.

परळीतील साहित्यिक, शिक्षणक्षेत्रातील आबासाहेब वाघमारे गुरुजी यांच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमाला रविवारी रात्री पहिल्यांदाच कौटुंबिक कलहानंतर कट्टर राजकीय विरोधक बनलेले पंकजा मुंडे आणि  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एका व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमाची उत्सुकता ताणली गेली होती. राजकीय विरोधक बनल्यानंतर शहरात जाहीर कार्यक्रमाला पहिल्यांदाच दोघांनीही हजेरी लावली. व्यासपीठावर वाघमारे गुरुजींचा सत्कार करण्यात आला. दोघांनी समोरासमारे येऊनही बोलणे टाळले मात्र भाषणात एकमेकांना चिमटे घेण्याची संधी सोडली नाही. मुंडे कुटुंबातील फाटाफुटीनंतर दोघे बहीण-भाऊ मागच्या वर्षी मुंबईतील एका कार्यक्रमात एकत्र आले होते. दिवाळीत परळी शहरात व्यापाऱ्यांना शुभेच्छा देत फिरत असताना अचानक समोरासमोर आल्यानंतर त्यांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र जाहीर कार्यक्रमात ते पहिल्यांदाच एकत्र आले तरी थेट बोलणे टाळले.

Story img Loader