भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेवर टीका करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाल्याच्या मुद्द्यावरुन आता बीडमधील राजकारण तापलंय. पंकजा यांनी आज केज पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आपण बाबासाहेबांचा अपमान केलेला नाही असं म्हणत धनंजय मुडेंनीच अपमान केल्याच्या पलटवार केला. त्यावर उत्तर देताना धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्यावर कठोर शब्दात टीका केलीय.

प्रकरण काय?
पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यामध्ये मोठा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत सत्ताधारी आमदरांवर म्हणजेच धनंजय मुडेंवर निशाणा साधला. बीड जिल्ह्यात माफियाराज सुरू झाला आहे असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना पंकजा यांनी आपण सामाजिक न्याय विभागावरुन टीका केली होती ज्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा दावा केला.

पंकजा काय म्हणाल्या?
“आम्ही जर भाषण करताना म्हटलं की बीड जिल्ह्याला पहिल्या चारमधील मंत्रीपदाची सवय आहे, तुमचा नंबर ३२ वा आहे. आता जे आहे ते आम्ही बोललो, आम्ही काय खिजवलं नाही. मी ३२ वा नंबर म्हणाले मी औकात काढली का? तुम्ही माझा तो व्हिडिओ परत एकदा पाहू शकता. मी तुमची ताकद आहे का? असं म्हणाले, औकात नाही काढली,” असं पंकजा यांनी आपल्या टीकेवरुन होणाऱ्या वादावर स्पष्टीकरण देताना सांगितलं.

नक्की वाचा >> पंकजा यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेचं आव्हान; म्हणाले, “बीडच्या माफियाराजवर बोलत असाल तर…”

“ते म्हणतात तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. मी ३२ नंबरचं मंत्रीपद म्हटलं तर यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान काय आहे? बाबासाहेबांचा अपमान तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते करतात. खोटे अ‍ॅट्रासिटीचे गुन्हे दाखल करतात, कायदा वापरतात, पोलिसांना घरी कामाला ठेवल्यासारखं वापरून घेता. तुम्ही बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान करत आहात. बाबासाहेबांनी अ‍ॅट्रासिटीचे कवचकुंडलं गरिबांना वाचवण्यासाठी दिलेले आहेत. त्याचा गैरवापर बीड जिल्ह्यात जर कुणी केला तर ते खपवून घेतलं जाणार नाही. आयत्या पीठावर रेघोट्या ओढण्याची यांना सवय झालेली आहे. परंतु आता लोकांसमोर सत्य आलेलं आहे,” असं म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

धनंजय मुंडे काय म्हणाले?
याचसंदर्भात पत्रकारांनी धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना प्रश्न विचारला. मी औकात नाही ताकद म्हणाले होते. माझ्या शब्दांचा अपभ्रंश करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान आम्ही नाही तर तुम्ही केलाय, असाही ते आरोप करतायत. अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यांबद्दलही त्या बोलल्यात, असं म्हणत पत्रकारांनी धनंजय मुंडेंना छेडलं असता त्यांनी पंकजा यांच्यावर टीका केली.

“आता एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही म्हणाला होता ३२ वा क्रमांक सामाजिक न्याय विभागाचा आहे. मग तुम्हाला नक्की यातून म्हणायचं काय होतं? म्हणजे पहिल्या दोनमध्ये नाही, पहिल्या १० मध्ये नाही. ३२ वं खातं आहे. ते काय करणार आहेत, हा कुणाचा अपमान आहे? हा परमपूजनीय बाबासाहेब अंबेडकरांचा अपमान नाहीय?, असा प्रश्न धनंजय मुंडेंनी विचारलाय.

“बोलताना एक तर भान राहत नाही. बोलल्यावर लोक विपर्यास करतात म्हणण्याला अर्थ नसतो. तुम्ही जे वक्तव्य केलंय त्यातून बाबासाहेबांचा अपमानच केलाय,” असं धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा सांगितलं.