भाजपा नेत्या पंकजा मुंडे सध्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांनी आज (३० जून) बीडमध्ये आयोजित सभेत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच २०२४ साठी जोमाने मैदानात उतरण्याचा निर्धार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. पंकजा मुंडे त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या, आपलं एकदा दुधाने तोंड पोळलं (भाजलं) आहे. त्यामुळे आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणारं वर्ष (२०२४) हे इतिहास घडवणारं म्हणजेच इतिहास बदलणारं वर्ष असेल. तुमच्या सगळ्यांची निस्वार्थ साथ मला आयुष्यभर मिळाली आहे. ही साथ मला यापुढेही मिळेल.
पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आज सकाळी मला माध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठलं आणि मला म्हणाले, ताई तुमच्याकडे काहीच नाही. तुम्ही आमदार नाही, तुम्ही खासदार नाही, तुम्ही साध्या ग्रामपंचायत सदस्यदेखील नाही. मग सगळे पक्ष तुमच्याविषयी का बोलत असतात. मी त्यांना म्हटलं, मला ते माहिती नाही. पण सध्या पंकजाताई सर्वसमावेशक चेहरा झाल्या आहेत.
पंकजा मुंडे यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि बीडवासियांना म्हणाल्या, पंकजाताई सर्वसमावेशक चेहरा झाल्या असल्या तरी माझा चेहरा तुम्ही आहात. तुम्ही माझा मान आहात, सन्मान आहात. त्यामुळे येणाऱ्या काळात मला तुमची साथ हवी आहे, फक्त एकदाच २०२४ मध्ये मला तुमची साथ हवी आहे आणि ती तुम्ही मला देणार आहात.
पंकजा मुंडे या परळी विधानसभेतून दोन वेळा (२००९ आणि २०१४) आमदार झाल्या आहेत. पंरतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धनंजय मुंडे यांनी म्हणजेच पंकजा यांच्या चुलत भावाने त्यांचा पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणातून साईडलाईन झाल्याची चर्चा होती. तसेच त्या त्यांच्या पक्षावर म्हणजेच भारतीय जनता पार्टीवर नाराज असल्याचं सतत बोललं जातं. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा >> “महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या नावाखाली…”, एकनाथ शिंदेंचा मोठा आरोप; म्हणाले, “मंत्रिमंडळात मीसुद्धा…”
“…तोपर्यंत फेटा बांधणार नाही”
यावेळी पंकजा मुंडे मराठा आरक्षणावरही बोलल्या. यावेळी त्यांनी एक निर्धार व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला राजेंद्र मस्के म्हणाले, फेटा बांधा. पण मी त्यांना म्हटलं, फेटा बांधणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी फेटा बांधणार नाही.