पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे… बीडमधल्या या भावा-बहिणींमधला राजकीय वाद सर्वश्रुत आहे. फक्त बीडपुरताच नाही, तर आख्ख्या महाराष्ट्राला त्यांच्यातला हा वाद आता माहिती आहे. धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि पंकजा मुंडे भाजपामध्ये अशा विरोधी पक्षांमध्ये असल्यामुळे हा वाद अनेकदा टोकाला गेल्याचं देखील दिसून आलं. त्यामुळेच जेव्हा पंकजा मुंडे करोना पॉझिटिव्ह आल्याचं समजलं, तेव्हा धनंजय मुंडेंनी ट्वीट करून काळजी व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काही जणांच्या भुवया उंचावल्या. मात्र, आता पंकजा मुंडेंनी आपण मुळात राजकारणात का आलो, याचा खुलासा केला आहे. आणि त्याचं कारण चक्क त्यांनी ‘धनंजय मुंडे’ असं सांगितलं आहे! लोकसत्ता डॉट कॉमनं घेतलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयी आपली भूमिका मांडली आहे.
“धनंजय मुंडेंना शुभेच्छाच दिल्या”
धनंजय मुंडे यांच्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. “धनंजय मुंडेंचं काम पसंत नव्हतं, म्हणून मी राजकारणात आले. मी राजकारणात येणार नव्हते. तेव्हाच्या परिस्थितीत इतकं बोललं जात होतं की धनंजय निवडून येणार नाही, पंकजा मुंडेंना उभं करा. नाहीतर मी राजकारणात येण्यासाठी अजिबात इच्छुक नव्हते तेव्हा. आत्ता आले. आता धनंजय मुंडे यांनी चांगलं काम करावं अशा शुभेच्छाही मी त्यांना दिल्या. पण मला नाही वाटत आता जिल्ह्यातले लोकं समाधानी आहेत”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
धनंजय मुंडे फक्त परळीपुरतेच मर्यादित
दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यपद्धतीतील उणिवा सांगितल्या. “धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा लोकांना त्रास आहे. त्यांच्यावर ते नियंत्रण ठेवत नाहीत ही लोकांमधली चर्चा आहे. मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलं. पण धनंजय मुंडे परळीपुरतं मर्यादित राहिले. मी राज्याची मंत्री म्हणून काम करताना परळीच्या एखाद्या कामाकडे दुर्लक्ष झालं असावं पण धनंजय मुंडेंचं जिल्ह्यामध्ये वास्तव्य करताना इतर ठिकाणी फारसा वावर दिसत नाही. जिल्ह्याचे विषय हाताळताना ते दिसत नाहीत. वाळू माफिया, सिविल सर्जन हे विषय हाताळताना ते दिसत नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांचा सुळसुळाट आहे. त्यावर लोकांची नाराजी आहे.”, असं त्या म्हणाल्या. “ज्या गुंड प्रवृत्ती आम्ही दाबून टाकल्या होत्या त्या आता पुन्हा बाहेर आल्या आहेत”, असं देखील पंकजा मुंडे यांनी नमूद केलं.
“पंकजाताई मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे,” धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट
मुंडे भगिनींसाठी धनंजय मुंडेंची पोस्ट!
एप्रिल महिन्यात पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं होतं. त्यावर धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट करून पंकजा मुंडे यांना धीर दिला होता. “पंकजाताई, करोना विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई,” अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती. प्रितम मुंडे यांना देखील प्रकृती अस्वास्थ्य जाणवत असताना धनंजय मुंडेंनी त्यांच्यासाठी पोस्ट केली होती.