भाजपाची लोकसभा निवडणुकीची दुसरी यादी बुधवारी जाहीर झाली. या निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना संधी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्या घरातलं दुसरं तिकिट म्हणजेच प्रीतम मुंडेंचं तिकिट कापण्यात आलं आहे. यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती आम्ही पार पाडू असं म्हटलं आहे. तसंच मला तिकिट मिळाल्याचा आनंद आहे. मात्र प्रीतम मुंडेंना मिळालं नसल्याने मनात संमिश्र भावना आहेत असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

लोकसभेचं तिकिट मिळेल अशी मला अपेक्षा होती. गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणातली उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी निश्चित नसते. त्यामुळे मला आत्मविश्वास नव्हता. आता मला उमेदवारी देण्यात आली आहे, मला त्याचा आनंद आहे. प्रीतम आणि माझं कॉम्बिनेशन चांगलं होतं. त्यांचं तिकिट कापून मला मिळालं त्यामुळे काहीशी संमिश्र भावना मनात आहे असं म्हणत पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं की धनंजय मुंडे यांचा संपर्क आहे का? त्यावर त्या हो म्हणाल्या. आम्ही रोज चर्चा करतो. तसंच आम्ही संपर्कात आहोत. माझं त्यांनी अभिनंदन केलं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसंच पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंबाबत आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

धनंजय मुंडे यांच्याबद्दल काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

धनंजय मुंडे यांचा पक्ष आणि आमचा पक्ष म्हणजेच भाजपा यांची युती आहे. आम्ही जिल्ह्यात एकत्र आहोत. त्यांनी महायुतीबरोबर येण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमचा जो मतदारसंघ आहे त्यावर प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता मला लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली. धनंजय मुंडे बरोबर असल्याने प्रीतमताईंपेक्षा जास्त मताधिक्क्याने मी निवडून येईन असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला आहे. आम्हा दोघांचाही संवाद आता वाढला आहे. धनंजय मुंडे यांच्याशी मन की बात झाली ती पत्रकारांना सांगणार नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

आमच्यापैकी एक नाव येणार हे अपेक्षित होतं. आता या निवडणुकीत काय परिस्थिती निर्माण होते ते बघितलं पाहिजे. आता स्वतःला उमेदवारी मिळाल्याने वेगळी परिस्थिती आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde expresses confidence that dhananjay munde is with us and will be elected with more votes than pritam scj