भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत प्रीतमताईंचं तिकिट कापलं गेल्याने काहीशा संमिश्र भावना मनात आहेत असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसंच पक्षाने जी जबाबदारी दिली ती पार पाडणार असंही त्यांनी सांगितलं.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

लोकसभेचं तिकिट मिळेल अशी मला अपेक्षा होती. गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणातली उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी निश्चित नसते. त्यामुळे मला आत्मविश्वास नव्हता. आता मला उमेदवारी देण्यात आली आहे, मला त्याचा आनंद आहे. प्रीतम आणि माझं कॉम्बिनेशन चांगलं होतं. त्यांचं तिकिट कापून मला मिळालं त्यामुळे काहीशी संमिश्र भावना मनात आहे असं म्हणत पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

आत्तापर्यंत अनेकवेळा माझं नाव चर्चेत विधानपरिषद किंवा राज्यसभा निवडणूक आली की माझं नाव चर्चेत यायचं. आता लोकसभेची तयारी मी करणार आहे. आता थोडा वेगळ्या पद्धतीने अनुभव मिळणार आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे आणि मी रोज बोलत असतो. आमचा संवाद झाला आहे. धनंजय ज्या पक्षात आहेत त्यांची आणि आमच्या पक्षाची युती झाली आहे. त्यामुळे ते माझ्यासाठी चांगला प्रयत्न करतील. आमच्या दोघींपैकी एक नाव आमच्यापैकी येणार हे मला माहीत होतं असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

आज माझ्या मनात हूरहूर आहे

भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जबाबदारी दिली आहे. या जबाबदारीचा मी सन्मान समजते. मनात थोडी हुरहुर वाटते आहे नोकरीच्या पहिल्या इंटरव्ह्यूला जाताना किंवा लग्नाच्या बोहल्यावर चढताना जशी हूरहूर वाटते तशीच भावना आज माझ्या मनात आहे. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

राजकीय वनवास संपला का?

काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांना तुमचा वनवास आता संपला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “राजकारण हा एक खडतर प्रवास आहे. तो कायमच सुरु असतो. पदावर असण्याने कमी खडतर असतो असं नाही. बीडची जनता काय करेल याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. माझा हा प्रवास कसा होईल यावर मलाही उत्सुकता आहे. प्रीतम मुंडेंच्या लोकसभेच्या निवडणुकीत संघर्ष केला होता. मी उत्सुक आहे की काय परिस्थिती निर्माण होईल. आधी दुसऱ्यांसाठी लढणं हा अनुभव होता. आता स्वतःसाठी उमेदवारी मिळाल्यावर अनुभव वेगळा असेल.”