दुष्काळी स्थितीत मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचे पाणी बंद करू नये, या वक्तव्यावरून वादात सापडलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘दारूवाली बाई’ अशा शब्दांत टीका केली. याचे पडसाद जिल्ह्यात उमटले असून, शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात मलिक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. सायंकाळी लक्ष्मी टॉवर परिसरात मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. इतर ठिकाणीही मलिक यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी एका दूरचित्रवाहिनीशी बोलताना दुष्काळी स्थितीत मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचे पाणी बंद करणे योग्य नसल्याचे वक्तव्य करून दारूच्या कारखान्यांच्या पाणी कपातीस विरोध केला. यावरून राज्यभर गदारोळ उठला. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्री मुंडे यांच्याविरुद्ध टीकेची झोड
उठवली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी पंकजा मुंडे यांच्यावर ‘दारूवाली बाई’ अशी टीका केली. मलिक यांच्या टीकेचे वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक माध्यमातून मलिक यांच्याविरुद्धही मुंडे समर्थकांनी टीकेची झोड उठवली. परळीत काही कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Story img Loader