Maharashtra Cabinet Expansion : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठे यश मिळवले. त्यानंतर दहा दिवसांपूर्वी देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता आज नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नव्या सरकाच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. दुपारी चार वाजता नवे मंत्री शपथ घेणार आहेत. अशात भाजपाकडून पंकजा मुंडे यांचे मंत्रिपदासाठी नाव निश्चित झाले आहे. यानंतर पहिलांदाच प्रतिक्रिया देताना पंकजा यांनी मंत्र्याच्या भूमिकेत दिसणार हे नक्की आहे, असे म्हटले आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
आज नागपूरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आणि मंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला दाखल झाल्या तेव्हा त्यांना पंकजा मुंडे कोणत्या भूमिकेत दिसतील असे विचारण्यात आले होते. याला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मंत्र्याच्या भूमिकेत दिसेन एवढे मला माहिती आहे. आता पुढच्या भूमिका पक्षश्रेष्ठी ठरवणार आहेत. त्यांनी आम्हाला पूर्वी ज्या भूमिका दिल्या त्या निवभावल्या आहेत आणि आताही निभावू.” पंकजा मुंडे यांनी नागपूरात साम टीव्हीशी बोलताना ही प्रतक्रिया दिली.
दरम्यान पंकजा मुंडे ही प्रतिक्रिया देताना त्यांच्याबरोबर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार जयकुमार रावल हे सुद्धा उपस्थित होते. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपाकडून शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार रावल यांनाही संधी देण्यात येणार आहे. त्यांना यावेळी पंकजा मुंडेंनी शुभेच्छा दिल्या.
परळीला दोन मंत्रिपदे
दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला (अजित पवार) सुटल्याने पंकजा मुंडे यांना लढता आले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विजयात पंकजा मुंडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. दरम्यान आज राष्ट्रवादीकडून (अजित पवार) धनंजय मुंडेही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशात भाजपाकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादीकडून (अजित पवार) असे दोन मंत्री परळीला मिळणार आहेत.
आज दुपारी नागपूरच्या राजभवनमध्ये होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. दुपारी ४ वाजता महायुतीच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल, असे राजभवनाच्या सूत्राकडून सांगण्यात आले. दरम्यान या शपथविधी सोहळ्यात महायुतीतील सर्व पक्षांचे २० ते २५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली , अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.