भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेच्या स्मृतीदिनी केलेलं भाषण चर्चेत आहे. लवकरच आपण अमित शाह यांना भेटणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की तुम्ही माझं काय करायचं ठरवलं आहे? असं पंकजा मुंडे भाषणात म्हणाल्या. ३ जूनच्या या भाषणानंतर पंकजा मुंडे भाजपात नाराज आहेत अशाही चर्चा सुरु झाल्या आहेत. बाळासाहेब थोरात यांनी पंकजा मुंडेंना काँग्रेसमध्ये यायची ऑफरही दिली आहे. तसंच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही पंकजा मुंडेंनी विचार करावा असं म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात रावण असा एक उल्लेख केला. हा रावण कोण याचं उत्तर आता मनसेचे नेते आणि पंकजा मुंडेचे मामा प्रकाश महाजन यांनी दिलं आहे.
प्रकाश महाजन यांनी काय म्हटलं आहे?
“जून २०११ या महिन्यात गोपीनाथ मुंडे यांनी एक भाषण केलं होतं. पक्षात त्यांची कोंडी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हे भाषण केलं होतं. कारण गोपीनाथ मुंडे एका ठराविक सीमेपर्यंत सहन करायचे मग ते स्पष्टपणे बोलायचे. पंकजाने काल केलेलं भाषण ऐकून मला गोपीनाथ मुंडेंच्या त्या भाषणाची आठवण झाली. कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता पंकजाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला. अशी हिंमत खूप कमी नेत्यांमध्ये हल्ली बघायला मिळते.”
पंकजा मुंडेंनी रावण कुणाला संबोधलं?
“भाषण संपताना पंकजाने रावणाचा उल्लेख केला. मी तो उल्लेख ऐकून चकीत झालो. गोपीनाथ गड ते संभाजीनगर प्रवास करत असताना मी हाच विचार करत होतो की रावण कुणाला उद्देशून म्हटलं गेलं असेल? कुणाचं नाव घेऊ शकत नाही. कारण पक्षातलीच व्यक्ती असेल. पंकजाच्या भाषणाचा पूर्वार्ध ऐकला तर लक्षात येतं की ती म्हणाली माझा एकच नेता आहे ते म्हणजे अमित शाह. मी त्यांना भेटणार आणि विचारणार की तुम्ही माझं काय करायचं ठरवलं आहे? हे वक्तव्य आणि रावणाचा संदर्भ जर लक्षात घेतला तर महाराष्ट्रातलाच कुणीतरी भाजपाचा बडा नेता आहे असंच म्हणता येईल. मी राजकारण पाहतो आहे, ३५ वर्षे भाजपात घालवली आहेत. महाराष्ट्रातलीच व्यक्ती आहे त्यांची तक्रार अमित शाह यांच्याकडे पंकजाला करायची असेल.” असं पंकजा मुंडेंचे मामा प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडेंच्या भाषणातला रावण कोण याच्या चर्चा सुरु झाली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश महाजन यांनी हे वक्तव्य केलं आहे.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?
“रामायणातली एक गोष्ट तुम्हाला मी सांगते. प्रभू रामांनी रावणाला संपवलं. मात्र रावणाला मुक्ती मिळाली नाही. रावणाची तडफड पाहून पार्वतीने महादेवांना विचारलं रावण तुमचा परमभक्त होता. त्याला शिक्षा मिळाली पण आता मुक्ती का मिळत नाही? तुम्ही त्याला मुक्ती देण्यासाठी तुम्ही का पुढाकार घेत नाही? तेव्हा महादेव पार्वतीला म्हणाले की रावण परमभक्त आहे, परम ज्ञानी आहे. पण त्याने स्त्रीचा अपमान केला आहे हे पाप तर केलंच आहे पण त्याने साधूच्या वेशात स्त्रीचा अपमान केला आहे. तसाच साधूचा वेश धारण करुन, कोणत्यातरी खुर्चीचा आधार घेऊन ही माझी जनता आहे तिचा जेव्हा अपमान होईल तेव्हा तेव्हा पंकजा मुंडे उभी राहिल. मला याच साठी गोपीनाथ मुंडेंनी राजकारणात आणलं.” असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.