मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातील नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत प्रतिक्रिया दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरली आहे.
एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला होता. यावेळी सत्तार यांनी थेट कॅमेऱ्यासमोरच गलिच्छ भाषेत सुप्रिया सुळेंचा उल्लेख केला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या विधानासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – अब्दुल सत्तारांना खुलं पत्र: महिलांना शिवीगाळ करण्यात कसला आलाय पुरुषार्थ ?
अब्दुल सत्तारांच्या आक्षेपार्ह विधानाबाबत विचारलं असता पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी अब्दुल सत्तारांचं वक्तव्य ऐकलं नाही. पण कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीने महिलेविषयी किंवा पुरुषांविषयी आदरयुक्त पद्धतीने टीका केली पाहिजे, असं माझं मत आहे. जर टीकेची पातळी घसरत असेल तर ती अयोग्य आहे” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे.
हेही वाचा- संतापजनक! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना मुलाखतीदरम्यान शिवीगाळ; Video झाला Viral
कृषीमंत्र्यांच्या या आक्षेपार्ह विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तारांच्या घरावर मोर्चा काढला आहे. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत घरच्या काचा फोडल्या आहेत. दुसरीकडे, सत्तारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलं आहे. मी अब्दुल सत्तारांवर काहीच बोलणार नाही, असं सुळेंनी म्हटलं आहे.