Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलं. मात्र, या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराडसह संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेतील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला एसआयटीने ताब्यात घेतलं. त्यानंतर आज वाल्मिक कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वाल्मिक कराडला बीड न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी मोठा गोंधळ केला. न्यायालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. तसेच काही ठिकाणी टायर देखील जाळले. त्यामुळे काहीवेळ मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, वाल्मिक कराडवर मंगळवारी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर परळीत तणाव निर्माण झाला होता. परळी बंदची हाक वाल्मिक कराडच्या समर्थकांनी दिली होती. तसेच काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. त्यामुळे ऐन संक्रातीच्या दिवशी परळीतील बाजारपेठ बंद होत्या. दरम्यान, या संपूर्ण परिस्थितीवर आज (१५ जानेवारी) भाजपाच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया देत भाष्य केलं. तसेच बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थिवर पंकजा मुंडे यांनी आपण लवकरच यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं स्पष्ट केलं.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

“बीडमध्ये काय सुरु आहे, याबाबत मला माहिती नाही. मी माझ्या दररोजच्या नियोजनाप्रमाणे काम करत आहे. त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी मॅटर करत नाहीत. माझ्यासाठी माझं दररोजचं काम महत्वाचं आहे”, असं मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं. तसेच परळीसह बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असं माध्यमांच्या प्रतिनिधींनी पंकजा मुंडे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, “बीड जिल्ह्यातील तणावाबाबत मी गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. तसेच जिल्ह्यातील तणाव कणी करण्यासाठी काय करता येईल ते ठरवणार आहे”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde on santosh deshmukh case and beed valmik karad beed court beed district agitation politics gkt