बीड लोकसभा निवडणुकीच्या निकालात पंकजा मुंडेंचा सहा हजार मतांनी पराभव झाला आहे. बजरंग सोनावणेंनी त्यांना पराभूत केलं आहे. लोकसभेच्या निकालात भाजपाच्या खासदारांची धूळधाण उडाली आहे. २०१९ मध्ये भाजपाचे २३ खासदार निवडून आले होते. यावेळी डबल डिजिटही भाजपाला गाठता आलेली नाही. कारण यावेळी भाजपाचे अवघे ९ खासदार निवडून आले आहेत. पक्ष फुटले तरीही त्यांच्या जागा जास्त निवडून आल्या असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

“पराभव झाला आहे हे तर मान्यच केलं पाहिजे. गोपीनाथ मुंडेंनी ती शिकवण आम्हाला दिली आहे. मी परळीवरुन बीड कडे निघाले तेव्हा ४३ हजारांनी मी पुढे होते. त्यानंतर १० हजार मतांनी सोनवणे पुढे गेले. हे काय झालं ते मी सांगू शकत नाही. तसंच फेरमतमोजणी झाली नाही ही लोकांच्या मनातही सल राहणार आहे. पण ठीक आहे माझा पराभव मला मान्य आहे. पराभव झाला तरीही लोकांसमोर हसत जायचं असतं. याचं कारण लोक आपल्यासाठी राबलेले असतात, त्यांना हे वाटता कामा नये की आपला नेता खचला आहे. मी मुळीच डळमळीत नाही. मला आनंद याचा आहे की मला भरघोस मतदान लोकांनी केलं. मी त्याबद्दल ऋण व्यक्त करते.” असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचाृ जबाबदारीतून मुक्त करा! फडणवीस यांच्या विनंतीने महायुतीत अस्वस्थता

बीडमधली १५०० मतं मोजली नाहीत, बेरीजही नीट तपासली गेली नाही

“१५०० मतं मोजलीच गेली नाहीत. बेरीज नीट तपासली गेली नाही याचं शल्य कार्यकर्त्यांना आहे. मी २२०० मतांवरही पराभव मान्य केला होता. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी आमची विनंती ऐकायला हवी होती. आता जो पराभव झाला आहे त्याचं शल्य माझ्या मनात नाही. कारण लोकांनी मला भरघोस मतदान केलं होतं. तसंच जे पदावर होते त्यांना शल्य जास्त वाटेल, मी तर काही तशी नव्हते. मी पाच वर्षे पदावर नव्हते तरीही मला लोकांनी भरभरुन मतदान केलं.” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

या निकालाचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर निश्चितपणे होईल

“या निकालाचा परिणाम हा नक्कीच विधानसभा निवडणुकीवर होईल. समोरच्या पक्षांचा आत्मविश्वास वाढेल. महाराष्ट्राच्या राजकारणात रडीचा डाव न खेळण्याचं कल्चर आहे. जे पक्ष फुटले तरीही त्यांची संख्या जास्त आली आहे. तिकडेही अनुभवी नेते आहेत. शरद पवारांसारखा ताकद असलेला नेता विरोधात आहे. शिवसेना फुटली तरीही उद्धव ठाकरेंना चांगलं यश मिळालं आहे. आता आम्ही पक्ष आणि युती म्हणून अधिक जोमाने काम करायची गरज आहे. कुणालाही कमी लेखून चालणार नाही. प्रत्येक गोष्टीचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर होत असतो, आपण काही ही गोष्ट नाकारुन जमणार नाही. मी माझ्या निवडणुकीच्या बाबतीतही सांगितलं होतं की जातीयवादाचा परिणाम निवडणुकीवर होतो आहे. प्रत्येक गोष्टीचा परिणाम होतो आता समोरच्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार आहे. महायुतीचे नेते आता याबाबत धोरण आखलं जाईल.” असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केलं आहे.