भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. कारखान्याची सुमारे १९ कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही यावर प्रतिक्रिया दिली. जीएसटी विभागाने पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला नोटीस पाठवली आहे, त्यावर त्या योग्य ते उत्तर देतील, असं विधान बावनकुळेंनी केलं.
चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाला पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. कारखान्याला नोटीस मिळाली नाही, तर कारखान्यावर कारवाई झाली, असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
हेही वाचा- “मी दररोज बँकांच्या पाया पडतेय”, आर्थिक तंगीबाबत पंकजा मुंडेंनी मांडली व्यथा
कारखान्याला नोटीस पाठवली असेल तर त्या उत्तर देतील, या बावनकुळेंच्या विधानाबाबत विचारलं असता पंकजा मुंडे म्हणाल्या, “ती नोटीस नाही ती कारवाई आहे. आता त्यांना मी काय बोलू. तुम्ही त्यांना प्रश्न विचारला असेल, त्यावर त्यांनी उत्तर दिलं असेल. कुणी काहीतरी बोललं आणि त्यावर मी उत्तर दिलं, तर यावरून बातम्या होतात. त्या बिचाऱ्यांनी (चंद्रशेखर बावनकुळे) काहीतरी बोललं असेल, त्याच्याशी माझं काहीही देणं-घेणं नाही. पण ती कारवाई आहे. त्यांना योग्य माहिती नाही.”
हेही वाचा- “…म्हणून मी अस्वस्थ आहे”, भाजपाबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंची थेट भूमिका
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
वैद्यनाथ सहकारी कारखान्यावरील कारवाईवर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “कोणत्याही सहकारी कारखान्याला नोटीस पाठवली असेल तर त्याला उत्तर देता येतं. शेवटी नोटीस पाठवणं तपास यंत्रणांचं काम आहे. त्यावर योग्य उत्तर गेलं की अशी नोटीस रद्द होते. त्यावर चौकशी होते. त्यात एवढं काही मोठं नाही. कुठलाही कारखाना किंवा कंपनीवर अनेकवेळा शंका उपस्थित केली जाते. अनेकदा ऑडिट चुकतं. त्यामुळे कारखान्यात काहीही झालं असेल तर पंकजाताई त्यावर उत्तर देतील.”