Pankaja Munde in Nagpur Vidhan Bhavan : लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेत वर्णी लागली आणि आता नव्याने मंत्रिपदाचीही शपथ घेतली. त्यांना कोणतं खातं मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरीही दहा वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा नागपूरच्या विधानभवनाची पायरी चढली आहे. याबाबत आज त्यांनी माध्यमांना दिलखुलास प्रतिक्रिया दिली.
भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक महिला नेत्या अशी पंकजा मुंडे यांची ओळख. पंकजा मुंडे यांच्या १५ वर्षांच्या राजकीय कारकार्दीमध्ये अनेक राजकीय चढउतार अनुभवणाऱ्या पंकजा मुंडे या ओबीसी बांधणीतील महत्त्वाच्या नेत्या असल्याचा संदेश त्यांनी राजकीय पटावर कायम नोंदवला. वडील गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूरांचे प्रश्न मांडत जलसंधारण मंत्री असताना जलयुक्त शिवार योजनेचे काम पुढे नेण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. धनंजय मुंडेंसोबतचा राजकीय संघर्ष, पक्षांतर्गत सतत चर्चेत असणाऱ्या पंकजा मुंडे पुन्हा मंत्री बनल्या आहेत.
त्या म्हणाल्या, “आज मी तब्बल दहा वर्षांनंतर नागपूरच्या प्रांगणात पाऊल ठेवलं आहे. मला नागपूरचं अधिवेशन खूप आवडायचं. मी पुन्हा या अधिवेशनात आले आहे. मी फार उत्साही आहे. खूप काम करण्याची एनर्जी मी साठवून ठेवली होती, ती एनर्जी आता मी कामात वापरणार आहे.”
पंकजा मुंडे २००९ ते २०१४ या सलग दोन वेळा विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. २०१४ मध्ये त्यांच्याकडे महिला आणि बालविकास खातं होतं. २०१९ मध्ये विधानसभेला त्यांचा पराभव झाला. तर यंदा लोकसभेलही त्यांना विजय मिळवता आला नाही. अलीकडेच त्यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली.
? नागपूर,
— Pankaja Munde's Office (@pmo_munde) December 16, 2024
हिवाळी अधिवेशन 2024 | दिवस पहिला |
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नव्या जबाबदारीसाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनात मा.ना.@Pankajamunde ताईसाहेब उपस्थित.#WinterSession2024 #Maharashtra #Nagpur pic.twitter.com/DjjZ6BnT3H
“मंत्र्याच्या भूमिकेत दिसेन एवढे मला माहिती आहे. आता पुढच्या भूमिका पक्षश्रेष्ठी ठरवणार आहेत. त्यांनी आम्हाला पूर्वी ज्या भूमिका दिल्या त्या निवभावल्या आहेत आणि आताही निभावू”, असं पंकजा मुंडे काल म्हणाल्या होत्या.
परळीला दोन मंत्रिपदे
दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला (अजित पवार) सुटल्याने पंकजा मुंडे यांना लढता आले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विजयात पंकजा मुंडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. धनंजय मुंडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.