महाराष्ट्रात पार पडणाऱ्या आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने त्यांचे पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीडमध्ये दारूण पराभव झाला. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतील नेतृत्वाने पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भाजपाने सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांनाही विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आज (२ जुलै) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “भविष्यातील निर्णय संघटना घेत असते. मंत्रिपदाबाबत मी भाष्य करण्याची गरज नाही. संघटनेची शिस्त पाळल्यानंतर संघटना प्रत्येक उमेदवाराला, नेत्याला योग्य संधी देत असते.”

पंकजा मुंडे म्हणाल्या, एक मास लीडर म्हणून करत असताना त्या त्या नेत्याला दोन गोष्टी सांभाळाव्या लागतात. लोकांच्या भावना आणि संघटनेची शिस्त पाळावी लागते. या दोन गोष्टींमध्ये समतोल साधावा लागतो. मी इतक्या वर्षांपासून राजकारणात आहे. लोकांच्या भावना सांभाळत असताना मी आमच्या संघटनेची शिस्त देखील पाळण्याचा, सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पाच वर्षांनी मला संघटनेने संधी दिली आहे. हा संपूर्णपणे संघटनेचा निर्णय आहे. तसेच भविष्यातील निर्णय संघटना घेत असते. मी त्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही आणि तशी पद्धत देखील नाही.

“मला एकाच गोष्टीचं शल्य…”

विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, “भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, भुपेंद्र यादव, आशिष शेलार या सर्वच नेत्यांची मी आभार मानते. विधान परिषदेसाठी माझं नाव सुचवणाऱ्या नेत्यांचे मी आभार मानते. लोकांना यासाठी प्रतिक्षा करावी लागली. मला हवंय ते करण्यापेक्षा लोकांना काय हवंय ते राजकारणात करायचं असतं. आता लोकांना हवंय ते झालंय”

हे ही वाचा >> विधान भवनात देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची भेट, लिफ्टकडे इशारा करत म्हणाले…

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली. याबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला जीवनात जे काही मिळणार आहे, ते मी त्या पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. ते आज असते तर त्यांनी घोषणाबाजी केली असती, परंतु ते आता नाहीत, याचं मला शल्य राहील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde remark on ministry after legislative council nomination asc