भाजपा महाराष्ट्रात वाढवण्यात आणि पक्ष मोठा करण्यात गोपीनाथ मुंडे यांचा वाटा मोठा होता. मात्र, यानंतरही त्यांना पक्षात संघर्ष करावा लागला. आता तोच संघर्ष गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येला करावा लागतो आहे का? असा प्रश्न पंकजा मुंडेंना विचारण्यात आला. यावर पंकजा मुंडे यांनी नाही असं म्हणत मला गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्ष करावा लागला, असं स्पष्ट मत व्यक्त केलं. याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्या मंगळवारी (२६ सप्टेंबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंकजा मुंडे म्हणाल्या, “गोपीनाथ मुंडेंना जो संघर्ष करावा लागला तोच संघर्ष मला करावा लागत नाहीये. मला गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्ष करावा लागत आहे. कारण गोपीनाथ मुंडेंच्यावेळी संघर्षाची एक पातळी होती. तो वैचारिक संघर्ष होता. दोन गटांमध्ये किंवा दोन विचारांमध्ये तडजोड झाली नाही, विचार एक झाले नाही, तर कुठंतरी ऐकण्याची जागा होती. आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळे माझा संघर्ष जास्त आहे.”

“मी १०० कोटी रुपयांचं कर्ज घेऊन दुसरीकडे वापरलं नाही”

“हा संघर्ष केवळ पक्षातला नाही, तर कार्यकारणीचा, आर्थिक अडचणींचा विषय आहे. त्या काळात झालेल्या गोष्टींचा हा विषय आहे. मी १०० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आणि दुसरीकडे वापरलं असं नाही. हे २००९-२०१२ या गोपीनाथ मुंडेंच्या काळातील कर्ज आहे. हा कर्जाचा, मतदारसंघातील संघर्षाचा विषय आहे,” असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

“गोपीनाथ मुंडेंना त्यांच्या घरच्यांविरोधात लढावं लागलं नाही”

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, “गोपीनाथ मुंडेंना त्यांच्या घरच्यांविरोधात लढावं लागलं नाही. मात्र, मला त्यांच्या आदेशामुळे लढावं लागलं. हा एक संघर्ष होता. मंत्रिपदाच्यावेळी समोर विरोधी पक्षनेते माझाच भाऊ होता. आता आम्ही त्यातून बाहेर आलो आहोत. त्यानंतर समाजाच्या निर्णयांचा संघर्ष होता.”

हेही वाचा : “हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, हात जोडून पंकजा स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”

“वारशाच्या गोष्टी टिकवण्यासाठी दहापट संघर्ष करावा लागतो”

“उदाहरणार्थ दसरा. या सर्व संघर्षांना गोपीनाथ मुंडे सामोरे गेले नाहीत, मी गेले. जशी वारसाने एखादी गोष्ट सहज मिळते, तशी ती टिकवण्यासाठी त्या व्यक्तीपेक्षाही दहापट संघर्ष करावा लागतो,” असंही गोपीनाथ मुंडेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde say did more struggle in party than gopinath munde pbs
Show comments