महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ पासून मोठी उलथापालथ सुरू आहे. निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला लागलेली गळती, त्यानंतर २०१९ मध्ये झालेला पहाटेचा शपथविधी, त्यानंतर अशक्य वाटणारं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार, अडीच वर्षानी एकनाथ शिंदेंचं बंड आणि रविवारी (२ जुलै) अजित पवारांनी केलेलं बंड या सगळ्या गोष्टी एकीकडे घडत असताना भाजपात फूट पडणार असल्याची चर्चा सुरू होती. भाजपा नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर आसल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांकडून दाखवल्या जात होत्या. पंकजा यांनी नुकतीच सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू होती. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारल्यावर नाना पटोले म्हणाले, “पंकजा मुंडे या जर काँग्रेसमध्ये आल्या तर आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत करु. सोनिया गांधींशी त्यांची याबाबत चर्चा झाली असेल तर चांगली गोष्ट आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आज (७ जुलै) पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याबद्दल सुरू असलेल्या सर्व अफवांचं खंडण केलं. तसेच त्यांच्याविरोधात खोट्या बातम्या दाखवणाऱ्या वृत्तवाहिनीबद्दल संताप व्यक्त केला. याविरोधात कायदेशीर लढाई लढेन असंही त्यांनी सांगितलं. आपण भाजपा सोडून कुठेही जाणार नसल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पंकजा मुंडे यांनी त्यांच्याबद्दल अशा चर्चा का सुरू आहेत, यावरही भाष्य केलं. ते करत असताना त्यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली. पंकजा मुंडे म्हणाल्या, अनेक पदांबाबत चर्चा सुरू होते. त्या पदावर माझी नियुक्त होईल असं सांगितलं जातं. त्याच्या बातम्या येतात. परंतु त्या पदावर माझी नियुक्ती होत नाही. मग मी पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या दाखवल्या जातात. परंतु यात माझा काहीच दोष नाही. यावर खरंतर पक्षाने उत्तर द्यायला हवं. संबंधित पदावर पंकजा मुंडे पात्र असतील-नसतील ते पक्षाने सांगावं. कारण याचं उत्तर मी किती वेळा देणार, मी ते देऊ शकत नाही.

पंकजा मुंडे म्हणाल्या, जेव्हा जेव्हा विधान परिषदेची निवडणूक झाली, भागवत कराड यांना राज्यसभा मिळाली, रमेश कराड यांना विधान परिषद मिळाली. त्यानंतरही विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. तेव्हा माझं नाव पुढे आलं. परंतु त्यानंतर माझं नाव मागे पडलं. त्यावर मी कुठेही टिप्पणी केली नाही. किंवा कुठलंही ट्वीट केलं नाही. सार्वजनिकरित्या कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. परंतु त्यावेळी माझ्या जुन्या-नव्या भाषणाचे तुकडे काढून त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात होते. बऱ्याचदा हे अर्थ समर्पकही बसतात.

हे ही वाचा >> डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

पंकजा मुंडे म्हणाल्या, या सगळ्या चर्चा होण्यामागचं कारण एकच आहे की, पंकजा मुंडे त्या पदावर का नाही. परंतु याचं उत्तर माझ्याकडे नाही. मला मागच्या दोन विधान परिषदेच्या निवडणुकांवेळी अर्ज भरायला सांगितला होता. दोन्ही वेळा पक्षाकडून मला सकाळी ९ वाजता अर्ज भरून यायलाही सांगितलं होतं. परंतु त्याच्या १० मिनिटं आधी मला सांगितलं की तुम्ही हा अर्ज भरायचा नाही. मी त्यांना ‘जसा तुमचा आदेश’ असं म्हणून पक्षाचा प्रत्येक आदेश शिरसावंद्य मानला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde says bjp asked me to file application for mlc twice asc
Show comments