भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज (२४ ऑक्टोबर) दसऱ्यानिमित्त सावरगाव येथील भगवान भक्तीगडावरून जाहीर सभा घेतली. या सभेला हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. कडक उन्हात घेतलेल्या या सभेत पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पंकजा मुंडे यांची पक्षात घुसमट होत असून त्या भाजपाला रामराम करून दुसऱ्या पक्षात जातील, असा दावा सातत्याने केला जात आहे. यावरही पंकजा मुंडे यांनी आजच्या सभेत भाष्य केलं.

पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्यात फक्त आणि फक्त नितीमत्ता आहे. माझ्याकडे दुसरं काहीच नाही. गोपीनाथ मुंडे यांची लेक म्हणून असलेली हिंमत आणि माझ्या लोकांचा माझ्यावर असलेला विश्वास, याच गोष्टी माझ्याकडे आहेत. माझ्यावर रोज आरोप होतात. कोणी म्हणतं ताई या पक्षात चालल्या, कोणी म्हणतं ताई त्या पक्षात चालल्या. कोणी म्हणतं आम्हाला असं कळलंय, कोणी म्हणतं आम्हाला तसं कळलंय. अरे, पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही.

पंकजा मुंडे म्हणाल्या, पदं देऊन जी निष्ठा तुम्हाला मिळवता आली नाही. पदं न देता निष्ठा काय असते ती या लोकांना विचारा. यांच्या (पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते, समर्थक) मनावर हजारो आघात झाले. दर वेळा यांचं स्वप्न तुटलं. तरी यांच्या डोळ्यात एक नवीन स्वप्न जन्म घेत आहे. मी मागच्या निवडणुकीत पडले, अरे पडले तर पडले. कोण पडत नाही? ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेवही त्यांच्या युद्धांमध्ये हरले होते. भैरवाने ब्रह्माचं एक शीर कापलं होतं. भगवान शिवाला हनुमानासमोर युद्धात नतमस्तक व्हावं लागलं होतं. विष्णूलाही अनेक संकटांना समोरं जावं लागलं होतं. या त्रिदेवांनाही संकटांना सामोरं जावं लागलं. देवीलाही लाखो असुरांबरोबर युद्ध करावं लागलं.

हे ही वाचा >> “आम्हाला त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधू”, भगवान भक्तीगडावरून पंकजा मुंडेंचा निशाणा; रोख कोणावर?

पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणात मी पडले. राजकारणात पडल्यावर कुबड्या घेऊन चालावं लागेल. या कुबड्या पक्ष देऊ शकतो किंवा जनता देऊ शकते. परंतु, मला या जनतेने एवढ्या कुबड्या दिल्या आहेत की दोन महिन्यांत मॅरेथॉनमध्ये पळण्याची हिंमत माझ्यात आली.