शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. ज्याप्रमाणे सिनेसृष्टीत दिलीपकुमार यांना मानाचे स्थान आहे, त्याचप्रमाणे पवार यांना राजकारणात स्थान आहे. त्यामुळे शरद पवार राजकारणातील दिलीपकुमार आहेत, अशा फिल्मी अंदाजात राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. त्या लातूरमध्ये बोलत होत्या.लातूर शहरात जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे शनिवारी अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अमित देशमुख, अभिनेता रितेश देशमुख यांच्यासह भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेदेखील उपस्थित होत्या. या वेळी पंकजा यांनी पवारांवर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला. पवार यांचा कट्टर विरोध करणारेदेखील त्यांचा तितकाच आदर करतात. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांची राजकारणापलीकडची घनिष्ट मत्री होती. जसे चित्रपटसृष्टीत दिलीपकुमार आहेत, तसे राजकारणात शरद पवार आहेत, असे पंकजा म्हणाल्या. मग पवार यांनीही पंकजा यांना त्यांच्याच फिल्मी अंदाजात दाद दिली. पंकजांनी मला दिलीपकुमार म्हटले, पण मी आजकालचे चित्रपट बघत नाही. म्हणून माझे अज्ञान लपवण्यासाठी मी रितेशला विचारले की, सध्या सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री कोण? त्याने मला दीपिका पदुकोणचे नाव सुचवले. तेव्हा पंकजा या नव्या पिढीच्या दीपिका आहेत. जर या मंचावर आज जुन्या पिढीतील दिलीपकुमार आले असतील, तर नव्या पिढीच्या दीपिका पदुकोण म्हणजेच पंकजा मुंडेदेखील उपस्थित आहेत, असे पवार या वेळी म्हणाले. अशाप्रकारे या अनावरण सोहळ्यात फिल्मी स्तुतिसुमनांचा कार्यक्रम रंगला. दरम्यान, पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्याबद्दलच्या काही आठवणींना या वेळी उजाळा दिला, तर पवार यांनीही आपल्या भाषणात विलासरावांसोबतच्या आठवणी जाग्या केल्या आणि विलासरावांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
जसे चित्रपटसृष्टीत दिलीपकुमार आहेत, तसे राजकारणात शरद पवार आहेत.
– पंकजा मुंडे, ग्रामविकासमंत्री
जर या मंचावर आज जुन्या पिढीतील दिलीपकुमार आले असतील, तर नव्या पिढीच्या दीपिका पदुकोण म्हणजेच पंकजा मुंडेदेखील उपस्थित आहेत.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी