IAS पूजा खेडकर प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पूजा खेडकर यांनी आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून त्यासंदर्भात सध्या चौकशी चालू आहे. त्यातच आता या प्रकरणाशी भाजपा नेत्या व विधानपरिषद सदस्य पंकजा मुंडे यांचं नाव जोडलं जाऊ लागलं आहे. यामुळे पंकजा मुंडे संतप्त झाल्या असून त्यांनी असा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, असा आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

पंकजा मुंडेंचा पूजा खेडकर प्रकरणाशी संबंध?

पूजा खेडकर त्यांच्या वर्तनामुळे व कागदपत्रांमुळे चर्चेत असताना त्यांच्या आई मनोरमा खेडकर पिस्तुल हातात घेऊन गावकऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आहेत. त्यात पंकजा मुंडेंनी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याकडून पैशांचा चेक स्वीकारल्याचा दावा केला जात आहे. पंकजा मुंडेंनी ट्रस्टसाठी हा चेक स्वीकारल्याचाही आरोप केला जात असताना त्यावर पंकजा मुंडेंनी टीव्ही ९ शी बोलताना तोंडसुख घेतलं आहे. तसेच, कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

“मीच कधीकधी माझ्याकडून जमतील तसे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला पैसे देत असते. पण अशा आरोपांमुळे मी अत्यंत्य व्यथित झाले आहे. मी निवडणुकीतील विजयाचा आनंद जनतेसोबत साजरा करत होते. पण हा आनंद काही लोकांना पाहावला नाही. पूजा खेडकर यांच्या बातम्या अनेक दिवसांपासून चालू आहे. पण कालच काही लोकांना काय साक्षात्कार झाला की त्यांनी ठरवलं की हे पंकजा मुंडेंशी जोडायचंय”, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली.

IAS Puja Khedkar used OBC quota : कोट्यवधींची संपत्ती असलेल्या पूजा खेडकर यांनी MBBS चा प्रवेशही ओबीसी कोट्यातून घेतला

“कुणीतरी किरकोळ माणूस येऊन काहीतरी बोलतो. मागेही असंच झालं होतं. माझ्याविषयी बातमी झाली होती. तेव्हाही मी मानहानीचा दावा केला होता. कोणतीही खात्री न करता काही माध्यमांनी ही बातमी चालवली हे मी सहन करू शकत नाही. मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानसाठी खेडकर यांच्याकडून एक रुपयाचा निधी घेतलेला नाही. माझा या सगळ्याशी काय संबंध आहे?” असा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित केला.

“मी पंतप्रधानांपेक्षा मोठी आहे का?”

दरम्यान, एखाद्या व्यक्तीला बोगसपणे आयएएस करण्याइतकी मी मोठी नाही, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. “मी प्रीतम मुंडेंचं तिकीट वाचवू शकले नाही. मी स्वत: निवडून येताना माझी दमछाक झाली. असं असताना मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यापेक्षा मोठी आहे का की एखाद्या व्यक्तीला मी बोगसपणे आयएएस करू शकते? यात काही तर्क आहे का? हे करण्याची शक्ती माझ्याकडे गेल्या पाच वर्षांत माझ्याकडे नव्हती. ती असती तरी मी तसं काही करणार नाही. मी यावर कायदेशीर पाऊल उचलणार नाही. इथून पुढे अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत”, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

IAS Pooja Khedkar : आयएएस पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी संबंध असल्याचे आरोप

“मी काय पाच वर्षं मंत्री आहे का? माझ्या कारखान्यांवर जप्तीच्या कारवाया होतात. मी माझ्याच अडचणींमध्ये आहे. मी या गोष्टी कोणत्या अधिकारांत करू शकते? आणि मी का करू हे?” असा सवालही त्यांनी केला.

“महाराष्ट्रात कितीजण खासगी गाड्यांवर लाल दिवा वापरतात?”

“पूजा खेडकर चुकल्या असतील तर शिक्षा होईल. नसतील चुकल्या तर खरं-खोटं होईल. पण मग तर आता या राज्यात किती लोक, मंत्री, अधिकारी आहेत जे खासगी गाड्या वापरतात आणि त्यावर लाल दिवा लावतात? माझं तर म्हणणं आहे की यावरही एक जनहित याचिका टाकली पाहिजे. आयएएससारखी महत्त्वाची परीक्षा कुणी चुकीच्या पद्धतीने उत्तीर्ण करत असेल, तर त्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. हा स्थानिक विषय आहे की हा राष्ट्रीय विषय आहे?” असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.