Pankaja Munde Targets Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. अमेरिका दौऱ्यातील त्यांच्या या विधानावरून भारतीय जनता पक्षानं परखड शब्दांत टीका केली असून राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. एकीकडे केंद्रातील भाजपा नेते राहुल गांधींना या मुद्द्यावर लक्ष्य करत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनीही राहुल गांधींवर टीका केली आहे. भाजपा नेत्या व विधानपरिषद सदस्य पंकजा मुंडे यांनी आज राहुल गांधींच्या विधानाविरोधातील भाजपाच्या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावरही तोंडसुख घेतलं.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
“काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जे विधान केलं, त्यातून देशभरातील अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षण प्राप्त लोकांमध्ये प्रक्षोभ निर्माण झाला आहे. मी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करते. जोपर्यंत राहुल गांधी त्यांच्या विधानाबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत आमचं आंदोलन प्रत्येकाच्या जनामतान, गल्लीबोलात सदैव चालू राहणार आहे”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. भाजपा आमदार आशिष शेलार यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
“राहुल गांधींचं पोटातलं ओठांवर आलं”
“संविधानाचा त्यांनी जो अवमान केला, आरक्षण रद्द करण्याची भाषा केली, ते आरक्षण ज्यांना मिळालं आहे, त्या वंचितांची ते जोपर्यंत क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे. देशात लोकसभा निवडणूक चालू असताना भाजपाबाबत अपप्रचार करून, काँग्रेसनं आरक्षण रद्द करणार अशी भाषणं करून, लोकांना भूलथापा देऊन त्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला होता. पण आज त्यांच्या मनातलं, त्यांच्या पोटातलं ओठात आलं आहे”, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.
Pankaja Munde: ओबीसी मतपेढीवर लक्ष ठेवूनच पंकजा मुंडे यांना आमदारकी ?
“खरंतर आपल्या देशाची प्रतिमा, देशाबाहेर प्रत्येक पक्षाच्या, विचाराच्या, प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने राखली पाहिजे. पण आपल्या देशाचा मान कमी करण्याचं काम राहुल गांधींनी त्या मुलाखतीत केलं आहे. भारतीय संविधानाचा अवमान त्यांनी करायला नको होता. या बाबतीत त्यांनी खुलासा करायला हवा. त्यांच्या मित्रपक्षांनी त्यांची भूमिका राहुल गांधींशी सहमत आहे का? याबाबत स्पष्ट खुलासा करायला हवा”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
“मोदींनी क्षमा मागितली, काँग्रेस नेते मागतील का?”
दरम्यान, छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला, तेव्हा प्रचंड वेदना झाल्याचं नमूद करत पंकजा मुंडेंनी काँग्रेसला लक्ष्य केलं. “पुतळा पडला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धैर्य दाखवून माफी मागितली. छत्रपतींबाबतचं प्रेम त्या भावनेतून व्यक्त केलं. राहुल गांधींच्या विधानानंतर देशातील आरक्षणप्राप्त लोकांच्या मनात, अनुसूचित जाती-जमातींमध्ये आक्रोश निर्माण झाल्यानंतर काँग्रेस नेते आता माफी मागतील का?” असा सवाल पंकजा मुंडेंनी केला.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी आरक्षणासंदर्भातल्या प्रश्नावर आपली भूमिका मांडली होती. “जर तुम्ही भारत सरकारकडे पाहिलं, तर तिथे ७० प्रशासकीय अधिकारी सरकार चालवत आहेत. पण या ७० पैकी कुणीही आदिवासी नाही, फक्त तीन दलित आहेत, तीन ओबीसी आणि फक्त एक अल्पसंख्याक आहे. वास्तव हे आहे, की यांना तिथे प्रतिनिधित्वच मिळत नाही. जेव्हा भारत एक न्याय्य राष्ट्र होईल, तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू. पण सध्या भारत न्याय्य ठिकाण नाही”, असं राहुल गांधी म्हणाले होते.
मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष!
दरम्यान, पंकजा मुंडेंनी यावेळी मनोज जरांगे पाटलांचं नाव घेत त्यांना लक्ष्य केलं. मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांवर आरक्षणाबाबत फसवणूक केल्याचा आरोप करत मराठा समाजाचा अवमान केल्याची टीका केली आहे. मात्र, आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या विधानावर पंकजा मुंडेंनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “आता राहुल गांधींच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील त्यावर काय बोलतात, हे ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.