शनिशिंगणापूर येथील शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याबाबत रंगलेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी पाथर्डी येथे घेतलेले शनीचे दर्शन अनेकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. पंकजा मुंडे यांनी शनिवारी आष्टी तालुक्यातील धामणगावकडे जाताना पाथर्डी येथील शनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी चौथऱ्यावर जाऊन शनी मुर्तीवर तेलाचा अभिषेकही केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज दिवसभरात शनिशिंगणापूरमध्ये रंगलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेचे हे शनी दर्शन विशेष ठरले आहे. या मंदिरात महिलांना मज्जाव नसला तरी महिलांना चौथऱ्यावर जाऊन शनीचे दर्शन घेता येत नव्हते. मात्र, आज पंकजा यांनी चौथऱ्यावर जाऊन शनीला तेलाचा अभिषेक केला.
काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी ‘महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने नाही, असे वक्तव्य केले होते. शनिशिंगणापूर येथील मंदिरात हट्टाने जाणाऱ्या महिलांनी समाजातील शांतता भंग करू नये,’ असा सल्ला त्यांनी दिला होता.
‘श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने नाही’- पंकजा मुंडे 


शनिशिंगणापूरमध्ये शनी चौथऱ्यावर दर्शनासाठी गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्थ्यांना स्थानिक गावकऱ्यांनी जोरदार धक्काबुक्की केली. तृप्ती देसाई यांनी दोनवेळा शनी चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी त्यांना प्रचंड धक्काबुक्की करत मंदिर परिसराच्या बाहेर काढले.
शनी मंदिरात प्रवेशबंदी हा अपमान कसा?
परंपरांचं संमोहन!