परळी येथे वैद्यनाथ साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीत रविवारी सकाळी मतदानादरम्यान राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. या घटनेनंतर पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आपल्या कार्यकर्त्यांसह काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले. दोघे समोरासमोर आल्याने मुंडे बहीण-भावात शाब्दिक चकमक उडाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान पालकमंत्र्यांच्या अंगरक्षकाने केलेल्या मारहाणीत राष्ट्रवादीचे शरद मुंडे जखमी झाले असून पोलिसांनी विरोधी पक्षनेत्यांनाही धमकावल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पहिल्यांदा होत असलेल्या या निवडणुकीत मुंडे कुटुंबातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे व अॅड. यशश्री मुंडे या भगिनींनी १० दिवस मतदारसंघ पिंजून काढला.
कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी धनंजय मुंडे व पंडितराव मुंडे यांनी पॅनलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली. सर्व ४५ मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर परळी शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा मतदान केंद्रावर भाजप उमेदवाराचा मुलगा संदीप लाहोटी आणि राष्ट्रवादीचे कार्यकत्रे शरद मुंडे यांच्यात मारामारी झाली. याची माहिती मिळताच पंकजा मुंडे काही क्षणात घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शरद मुंडे या कार्यकर्त्यांला मंत्र्यांच्या खासगी अंगरक्षकाने बेदम मारहाण केली. त्यानंतर धनंजय मुंडेही आपल्या समर्थकांसह दाखल झाले.
दोन्ही मुंडे बहीण-भाऊ आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला. दोघांत शाब्दिक चकमकही झाली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केला. पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डीदेखील घटनास्थळी दाखल झाले.
‘मंत्र्यांनी सत्तेचा वापर करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांला त्यांच्या अंगरक्षकाने मारहाण तर केलीच आणि पोलिसांनीही विरोधी पक्षनेत्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.