मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आले नसले तरी, राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री  म्हणून मीच आहे, असे वक्तव्य आमदार पंकजा मुंडे यांनी सोमवारी पुण्यात केले. पुण्यातील भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आज गोपीनाथ मुंडे असते तर तेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असते. त्यापूर्वीही साहेबांना मुख्यमंत्री होता आले नसले तरी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री तेच होते, असंही पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या. मी ज्या ज्या ठिकाणी जाते, त्या ठिकाणचे लोक तुम्‍ही मुख्‍यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त करतात. जनतेच्या मनातील भावना मला कळते. ती भावनाच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचे सांगत पंकजा यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली.
कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी आमदार पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम आणि खासदार राजीव सातव उपस्थित होते. यावेळी पंकजा यांनी राजीव सातव आणि विश्वजित कदम यांना उद्देशून आता तुम्ही मला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा द्यावा, असे सांगितले. मग पुढचे पुढे बघु. सध्यातरी दहा-वीस वर्षे तरी आम्हाला सत्तेत राहु दे. आधी आम्हाला संधी मिळु देत, तेव्हा प्रथम तुम्ही मला शुभेच्छा द्या. मग पुढे तुमची सत्ता आल्यावर तुम्हा दोघांनादेखील महत्त्वाची जबाबदारी मिळो, अशी अपेक्षा पंकजा यांनी व्यक्त केली. यावर बोलताना राजीव सातव यांनीदेखील पंकजा मुंडे यांच्या रुपाने राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून मराठवाड्याला मान मिळावा अशी इच्छा व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा