बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी दारून पराभव केला. पंकजा मुंडेंचा हा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांचा कार्यकर्ता पांडुरंग सोनवणे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई-वडील असं कुटुंब असल्याने त्यांची जबाबदारी आता पंकजा मुंडेंनी उचलावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. टीव्ही ९ मराठीने आज सोनवणे यांच्या कुटुंबियांशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पांडुरंग सोनवणे हे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील डीघोळ आंबा गावातील होते. दरम्यान, पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने ते नैराश्येत गेले होते, अशी प्रतिक्रिया आई सरूबाई सोनवणे यांनी दिली. “आम्ही एवढं तिच्यामागे फिरून आमचा उपयोग काय झाला? मग आमच्या जीवनात काही उपयोग राहिला नाही, असं तो म्हणत होता. शेवटी आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले. तो वेड्यासारखा करू लागला. त्यांचा फोटो घेऊन रडायचा. दवाखान्यात ११ वाजेपर्यंत राहिला. मला वाचायचंच नाही असं तो म्हणत होता. मला आत्महत्याच करायची आहे, असं म्हणत नाकात नळी असताना पळून आला. मला आता कोणाचीच गरज नाही, मला ताईचीच गरज होती, असं तो म्हणाला. रुग्णालयातून आल्यावर तसाच शेतात गेला. आम्ही येण्याआधीच त्याने शेतात जाऊन आत्महत्या केली”, असं मृत कार्यकर्त्याच्या आईने सांगितलं.

मृत कार्यकर्ता पांडुरंग सोनवणे यांच्या मुलाच्या नावावर सहा गुंठे आणि वडिलांच्या नावावर २७ गुंठे जमीन आहे. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे, अशी माहितीही त्यांच्या आईने दिली. दरम्यान, कार्यकर्त्याने आत्महत्या केल्यावर पंकजा मुंडेच्या कार्यालयातून कोणाचे फोन आले का असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “कालपासून कोणाचा फोन वगैरे आलेला नाही. पण त्याच्या लेकराच्या भविष्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी. त्याची बायको आणि आम्ही म्हातारे-म्हातारी आमची काळजी घ्यावी. आमची प्रॉपर्टी नाही. त्यामुळे आमच्यावर लक्ष देऊन सांभाळावं”, अशी विनंतही त्यांनी केली.

हेही वाचा >> “पंकजा मुंडे पराभूत झाल्या तर जीव देईन”, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा बस अपघातात मृत्यू

दरम्यान, यावेळी गावकऱ्यांशीही संवाद साधण्यात आल्या. गावकरी म्हणाले की, पांडुरंग सोनवणेंचं पंकजा आणि धनंजय मुंडेंवर नितांत प्रेम होतं. ४ जूनचा निकाल लागल्यानंतर मी उसतोड कामगार, आता माझं खरं नाही असं म्हणत तो नैराश्येत गेला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केलं. दाखल केल्यानंतर तो एक दिवस दवाखान्यात राहिला. सकाळी स्टँण्डवर आला. ताईंचा फोटो दाखवून रडायला लागला. माझ्या घरासमोर भाजपाची मीटिंग आहे असं सांगून शेताच्या दिशेने गेला आणि शेतात जाऊन आत्महत्या केली.”

“ताईंचा अजून फोन आलेला नाही. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की तो भाजपाचा कार्यकर्ता होता. त्याचं कुटुंब रस्त्यावर येण्यापेक्षा त्याच्या लेकराबाळांची जबाबदारी घेऊन ताईंनी मदत करावी, अशी आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे”, असं एका ग्रामस्थाने सांगितलं.

पंकजा मुंडेंनीही घेतली दखल

दरम्यान, या आत्महत्येची दखल पंकजा मुंडे यांनीही घेतली आहे. त्यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करून कार्यकर्त्यांना आवाहन केलंंय. “स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे, संयम ठेवत आहे, तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव, तुम्हीही पचवा!! अंधारी रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो. तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक रहा”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार पंकजा मुंडे मृत कार्यकर्त्याच्या मुलाची जबाबदारी उचलतात का हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde workers suicide due to depression mother says tais picture taken sgk
Show comments