विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची नावे जाहीर करताना भाजपाने पंकजा मुंडेंसह तीन ओबीसी नेत्यांना संधी दिली आहे. पंकजा मुंडेंना विधान परिषदेत संधी मिळाल्याने त्यांचा राजकीय वनवास संपला असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जातेय. दरम्यान, आज त्या उमेदवारीचा अर्ज भरणार असून त्याआधी त्यांनी मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले, त्यानंतर त्या वरळीत दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पंकजा मुंडे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, “सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करू इच्छिते. मी आधी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं आणि आता या लोकांना भेटायला आले. ज्यांनी कधीही मला क्षणभरदेखील स्वतःला, स्वतःच्या हृदयपासून दूर ठेवलं नाही. माझ्या सर्व वाईट काळात ते माझ्याबरोबर राहिले. त्यांचं दर्शन घेतलं आणि आता आईचं दर्शन घ्यायला चालले आहे. मग मी अर्ज दाखल करेन.”

“मी माझे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर भाऊ, रावसाहेब दानवे, भुपेंद्र यादव, आशिष शेलार या सर्वच सदस्यांचे आभार मानते, ज्यांनी माझं नाव सुचवलं”, असंही त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, “लोकांना प्रतिक्षा करावी लागली. मला हवंय ते करण्यापेक्षा लोकांना हवंय ते राजकारणात करायचं असतं. आता लोकांना हवंय ते झालंय, मी सर्वांचे आभार मानते.”

हेही वाचा >> पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…

माझं यश या पाच जणांना अर्पण

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली. पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. याबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला जीवनात जे काही मिळणार आहे, ते मी त्या पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. ते आज असते तर त्यांनी घोषणाबाजी केली असती, परंतु ते आता नाहीत तर मला त्यांचं शल्य राहील. त्यांना हे मी समर्पित करते”, असंही त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे ठरल्या अपवाद

पंकजा मुंडे यांना लोकसभेसाठी बीडमधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. पण आता विधान परिषदेची उमेदवारी देऊन भाजपाने त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं आहे. पंकजा मुंडे यांचा २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी, अशी मागणी होत होती. पण प्रत्येक वेळी आपल्याला डावलण्यात आल्याची भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवाराना राज्यसभा किंवा विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार नाही, असा निकष भाजपामध्ये पाळला जातो. पण मुंडे त्याला अपवाद ठरल्या.