भाजपच्या आ. पंकजा मुंडे-पालवे यांची संघर्ष यात्रा शुक्रवारी येथे प्रवेश करणार असून दादासाहेब गायकवाड सभागृहात सायंकाळी सात वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेपूर्वी सहा वाजता औरंगाबाद नाक्यापासून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियोजनाविषयी क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था आणि अखिल वंजारी विकास परिषद यांच्या वतीने बैठक घेण्यात आली.
बैठकीस माजी मंत्री तुकाराम दिघोळे, एन. एम. आव्हाड, प्रल्हाद पाटील कराड, संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, विश्वस्त डॉ. धर्माजी बोडके, बबनराव सानप आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाशिकवर व संस्थेवर विलक्षण प्रेम होते. त्यामुळे त्यांच्या प्रेमापोटी आणि पंकजा यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने संघर्ष यात्रेत पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी केले आहे.