कॉ. गोविंद पानसरे यांची रक्षा विसर्जति न करता ती छोटय़ा कुंडीत भरून नेऊन प्रेरणा रुपात जतन करण्याचा निर्णय सोमवारी भाकपच्या कार्यकर्त्यांनी केला. सकाळी पंचगंगा नदीपात्रात १०० छोटय़ा कुंडय़ांमध्ये रक्षा भरण्यात आली. ती प्रत्येक जिल्हा व तालुका कार्यालयात नेण्यात येणार असून तेथे कुंडीत वृक्षारोपण केले जाणार आहे. उगवणारा वृक्षच अण्णांच्या कार्याचे स्मरण करून देऊन लढण्याचे नवे बळ देईल, असा विश्वास या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
भाकपचे ज्येष्ठ नेते गोिवद पानसरे यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पानसरे यांच्या पुरोगामी विचाराची कास धरून कसलेही धार्मिक विधी करण्यात आले नव्हते. त्याचाच प्रत्यय सोमवारी रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमावेळीही आला. आज सकाळी ९ वाजता नदी घाटावर जमलेल्या पक्षाच्या महिला-पुरूष कार्यकर्त्यांनी धार्मिक कार्याला व परंपरेलाही फाटा दिला. एरव्ही रक्षा विसर्जनावेळी रक्षा कुंडीमध्ये विसर्जित केली जाते. तथापी आज रक्षा विसर्जित करण्याऐवजी कार्यकत्यांनी ती प्रेरणा रुपात जतन करण्याचा पुरोगामी निर्णय घेतला. यामागे पर्यावरणाचे रक्षण करण्याचाही हेतू होता.
कार्यकर्त्यांनी साबत आणलेल्या सुमारे १०० कुंडय़ांमध्ये अस्थि व रक्षा भरून घेतली. त्यास लाल वस्त्र बांधण्यात आले. या कुंडय़ा पक्षाच्या जिल्हा व तालुका स्तरावर कार्यकत्रे घेऊन जाणार आहेत. पक्षाच्या कार्यालयासमोर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. भविष्यात हे वृक्षच पानसरे यांचा धगधगता विचार कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहणार आहे. समाजाच्या भल्याचे विचार पेरण्याचे विचार अण्णांनी हयातभर केले. तोच विचार वृक्षरुपाने उगवेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केला. २ फेब्रुवारी रोजी भाकपच्या वतीने राज्यव्यापी सत्याग्रह होणार असून या सत्याग्रहाचा भाग म्हणून या दिवशी कुंडींमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा