महाविकास आघाडीचे सरकार असताना मला आणि तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच नाही तर तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाच्या इतर काही नेत्यांना अटक करण्यासाठीसुद्धा अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता, असा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच यासंदर्भात शरद पवार यांच्या सिल्वर ओक आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी बैठक झाली होती, असे ते म्हणाले. त्यांच्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले परमबीर सिंह?
शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर बैठक पार पडली होती. या बैठकीला शरद पवार, अनिल देशमुख, अनिल गोटे आणि पी.पी. चव्हाण उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी माझ्यावर विरोधकांवर खोटी कारवाई करण्यासंदर्भात दबाव आणला. मात्र, मी त्यांना नकार दिला. मी अशाप्रकारे कुणावरही खोटा गुन्हा दाखल करणार नाही, असं स्पष्टपणे सांगितले, असं परमबीर सिंह म्हणाले.
“सिल्वर ओक पार पडली होती बैठक”
“सिल्वर ओकवरील बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानीदेखील एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीलासुद्धा अनिल देशमुख उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मुंबई बॅंक प्रकरणात प्रवीण दरेकर यांना अटक करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. तेव्हाही मी त्यांना सांगितले की याप्रकरणाची चौकशी झाली असून ही केस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मी पुन्हा कोणावरही कारवाई करणार नाही”, असंही त्यांनी सांगितले.
“मविआ सरकारकडून देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याचा प्रयत्न”
“महाविकास आघाडी सरकारने माझ्याविरोधात खोट्या केसेस दाखल करून मला अटक करण्याचा प्रयत्न केला. इतकच त्यांनी तर त्यांनी ठाण्यातील एका जुन्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात तत्कालिन विरोधी पक्षनेते आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अटक करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाची चौकशी तेव्हाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांनी केली होती. त्यांना थेट संजय पांडे यांच्याकडून निर्देश मिळत होते. तर संजय पांडे यांना अनिल देशमुख, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून निर्देश दिले जात होते. त्याप्रकरणात केवळ मलाच नाही तर देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला”, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Parambir Singh : परमबीर सिंह यांचं अनिल देशमुखांना खुलं आव्हान; म्हणाले, “चला समोर या आपण दोघं..”
“एकनाथ शिंदे यांनाही अडकवण्याचा प्रयत्न झाला”
“याशिवाय आश्चर्याची बाब म्हणजे याच प्रकरणात तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्यांना अटक करण्यासाठी संजय पांडे यांनी सरदार पाटील यांना निर्देश दिले होते. याचाच अर्थ तेव्हाच्या मुख़्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता”, असा दावाही परमबीर सिंह यांनी केला.