महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह गेल्या कित्येक दिवसांपासून गायब आहेत. न्यायालयात देखील सुनावणीसाठी ते येत नसल्यामुळे आणि तपास यंत्रणांसमोर चौकशीसाठी हजर होत नसल्यामुळे ते फरार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती चंडीवाल आयोगासमोर सुनावणी सुरू असताना त्यांच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून त्यासोबत जोडण्यात आलेल्या पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीमुळे परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परमबीर सिंह चंदीगढमध्ये असल्याचं बोललं जात आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परमबीर सिंह यांनी केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपांनंतर त्यांच्या विरोधात देखील अनेक आरोप झाले आहेत. यासंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चंडीवाल यांच्या आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीसाठी सातत्याने विचारणा करून देखील परमबीर सिंह उपस्थित राहिले नसल्यामुळे ते नेमके कुठे आहेत? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात तपास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती चंडीवाल आयोगाची स्थापना केली आहे. याच आयोगासमोर सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत परमबीर सिंह सातत्याने सुनावणीसाठी गैरहजर राहात आहेत. सीबीआयकडून देखील सुरू असलेल्या तपासासाठी ते उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांच्या ठावठिकाण्याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. मात्र, अशातच परमबीर सिंह यांनी त्यंचे वकील अभिनव चंद्रचूड यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रासोबत खुद्द परमबीर सिंह यांनी तयार केलेल्या पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीमुळे त्यांचा ठावठिकाणा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परमबीर सिंह बेपत्ता; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

परमबीर सिंह यांनी ही पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी चंदीगढमध्ये तयार केली आहे. कागदपत्रांवर पत्ता चंदीगढचाच असल्याने ते चंदीगढमध्येच असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महेश पांचाल या व्यक्तीच्या नावे परमबीर सिंह यांनी ही पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी बनवली असून आपल्या ऐवजी महेश पांचाल न्यायालयीन आयोगासमोर सुनावणीसाठी उपस्थित राहतील, असं त्यांनी त्यात म्हटलं आहे.

“आयोगासमोर काहीही सांगायचं नाही”

दरम्यान, परमबीर सिंह यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांना आयोगासमोर काहीही सांगायचं नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. “परमबीर सिंह यांच्याकडे कोणताही युक्तीवाद किंवा प्रतिवाद करण्यासाठी कोणतेही पुरावे नसून त्यांना आयोगासमोर काहीही मत मांडायचं नाही”, असं या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.