परभणी : ‘सीसीआय’ने कापसाची खरेदी गुंडाळल्यानंतर आणि बहुतांश शेतकर्यांकडील कापूस विकल्यानंतर आता कापसाच्या बाजारात काही प्रमाणात तेजी आलेली आहे. परभणीच्या खाजगी बाजारात कापसाला ७७०० रूपये असा प्रतिक्विंटलला दर मिळाला. बहुतांश शेतकर्यांनी आपला कापूस ७ हजार रूपये प्रतिक्विंटलने घातल्याने आता पांढरे सोन्याला झळाली येवू लागली आहे.
यावर्षी केंद्र सरकारने ७५२१ रूपये असा कापसाला प्रतिक्विंटलचा दर हमीभावानुसार निश्चित केला. कोणत्याही शेतकर्यांना एवढा दर मिळाला नाही. सुरुवातीला ‘सीसीआय’ खरेदी प्रक्रियेत उतरणार की नाही याबाबत काहीच स्पष्ट होत नव्हते. पुढे ‘सीसीआय’ची खरेदी सुरु झाली आणि काही दिवसानंतर त्यात व्यत्त्यय आला. ऑनलाईन पोर्टलमध्ये बिघाड झाल्याचे सांगून बरेच दिवस ‘सीसीआय’ची खरेदी बंद झाली. त्यानंतर पुन्हा कापसाचे भाव उतरले. हे दर प्रतिक्विंटलला ७ हजारापेक्षाही खाली आले. शेवटच्या काही दिवसात पुन्हा ‘सीसीआय’ची खरेदी सुरु झाली. आता केवळ खाजगी व्यापार्यांमार्फत कापसाची खरेदी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कापसाच्या दरात हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे.
परभणी बाजार समितीच्या आवारात काल खाजगी बाजारात कापसाला प्रतिक्विंटल ६३५० ते ७७१० असा दर मिळाला. जिल्ह्यात परभणीसह मानवत, सोनपेठ, सेलू या तालुक्यांमध्ये कापसाचे उत्पादन जास्त होते.हंगामाच्या दिवसात या ठिकाणच्या बाजारात कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर असते. आता शेतकर्यांकडील कापूस जवळपास संपला आहे. काही आपवादात्मक शेतकर्यांकडेच सध्या कापूस असल्याचे दिसून येत आहे. शेतकर्यांकडील कापूस संपल्यानंतर दरात हळूहळू सुधारणा होताना दिसून येत असून कापसाला ७७०० असा कमाल दर सध्या मिळू लागला आहे. या हंगामात पहिल्यांदाच हमीभावापेक्षा अधिकचा दर सध्या खाजगी बाजारात मिळत असला तरी बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस विकला आहे.