शिवसेना ( ठाकरे गट ) परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव अलीकडे चर्चेत आले आहेत. शिवसेनेत बंडखोरीवरून बंडू जाधवांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. अडीच वर्षात कार्यकाळात आम्हाला सत्तेचा लाभ झाला नाही. उद्धव ठाकरेंनी पक्षसंघटनेकडे स्वत: लक्ष दिलं नाही. अन्य कोणाला अधिकारही दिले नाहीत. त्यामुळे आमच्यावर हा प्रसंग ओढावला, असं विधान बंडू जाधवांनी केलं होतं. त्यातच आता बंडू जाधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका कार्यक्रमात बोलताना बंडू जाधव म्हणाले की, “शिवसेना ही ठाकरेंशिवाय होऊ शकत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा आजचे मुख्यमंत्री पाळण्यात लोळत होते. त्यांनी शिवसेनेवर हक्क सांगावा हे आम्हाला आणि महाराष्ट्रातील सामान्य माणसाला पटलं नाही. शिवसेना ठाकरेंचीच होती आहे आणि राहणार, यात दुमत नाही,” असं बंडू जाधवांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : “एकदाच आम्हाला गोळ्या घालून…”, ईडीच्या धाडीनंतर हसन मुश्रीफांच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया

“पन्नास खोके काय, शंभर खोके आले तरी…”

दरम्यान, ६ मार्चला बोलताना बंडू जाधवांनी म्हटलं होतं, “एका सामान्य परिवारातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मी मुलगा आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमुळे आमदार, मार्केट कमिटी, खासदार या सर्व पदांवर काम करण्याचं भाग्य मिळालं. हा जन्म काय, सात जन्म पक्षाचे उपकार फेडू शकणार नाही, एवढं दिलं आहे. त्यामुळे पन्नास खोके काय, शंभर खोके आले तरी माझ्या उंचीसमोर खूप ठेंगणं वाटतात.”

हेही वाचा : “अनिल देशमुखांवर १०९ वेळा छापेमारी, हसन मुश्रीफांविरोधात हा विक्रम ईडी आणि…” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

“पोराला मंत्री व्हायचं होतं, तर तुम्ही…”

तर, उद्धव ठाकरेंचे कान टोचताना सांगितलं होतं, “तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर पोराला मंत्री करायला पाहिजे नव्हतं. पोराला मंत्री व्हायचं होतं, तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होतं. तुम्ही खुर्ची आटवल्याने ह्यांना वाटलं उद्या बाप गेल्यावर पोरगं माझ्या बोकांडी बसेल. त्याच्यापेक्षा वेगळी चुल मांडली, तर काय बिघडलं. आणि याच भूमिकेतून ही गद्दारी झाली,” असे बंडू जाधव म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parbhani mp sanjay bandu jadhav attacks eknath shinde over shivsena dispute ssa