परभणी : महानगर पालिकेमार्फत शहरातील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला सुरूवात  झाली असून त्याची सुरुवात प्रशासकीय इमारतीच्या संरक्षणभिंती लगतचे अतिक्रमण काढून करण्यात आली. मंगळवारी (दि.११) प्रभाग समिती ‘अ’ अंतर्गत गणेशनगर पसिरातील महात्मा फुले विद्यालयाच्या समोरील महानगरपालिकेच्या खुल्या जागेवर बांधकाम करून उभारण्यात आलेली तीन अतिक्रमणे काढून टाकण्याची कारवाई सहायक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

हे अतिक्रमण काढण्यासाठी परिसरातील नागरिक सातत्याने पाठपुरावा करत होते. यामुळे सहायक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे हे पुरेसे कर्मचारी व पोलिसांना सोबत घेऊन एका पथकाद्वारे अतिक्रमणाच्या जागेवर पोहोचले. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर  अतिक्रमणधारकांनी विरोध केला मात्र नियमानुसार मोजणी करूनच अतिक्रमण काढून घेण्यात येईल असे नागरिकांना समजावण्यात आले. त्याप्रमाणे जागेची मोजणी करून अतिक्रमणधारकांना कुणा करून देण्यात आल्या. त्यानंतर अतिक्रमण काढून घेण्याबाबत कार्यवाही करण्यात आली.

महानगर पालिकेच्या सक्त कारवाईचा पवित्रा बघून काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यायला सुरुवात केली. ही कारवाई शाखा अभियंता राहुल धुतडे, कर अधिक्षक जुबेर हाश्मी, नगर रचना विभागाचे मीर अल्तमश, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड आदिंसह तिन्ही सुरक्षा रक्षक आणि सर्व सफाई कर्मचारी व मुकादम यांनी मिळून केली. दरम्यान शहरात जिथे कुठे अतिक्रमण झाले असेल अशा ठिकाणी अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून टाकावे असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केले आहे.

Story img Loader