परभणी : आज येथे कडकडीत उन्हामुळे उष्णतेत मोठी वाढ झाल्याने ४३ अंशाचा पारा तापमानाने ओलांडला आहे. दरम्यान पुढील तीन दिवसात मराठवाड्यात आणखी दोन ते तीन अंशाने तापमानात वाढ होईल अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. पुढील दोन दिवसात परभणीचे तापमान ४५ अंशापर्यंत जाईल असा अंदाज आहे. तर शनिवारी (दि.२६) मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान परभणी तालुक्यातील उमरी या गावी उन्हामुळे भोवळ येऊन एका वृद्ध शेतमजुराचा मृत्यू झाला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमान चढत्या भाजणीने वाढताना दिसून येत आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार या तिन्ही दिवसात तापमान आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर मात्र एक दोन अंशाने हे तापमान कमी होईल असाही अंदाज देण्यात आला आहे. आजही दिवसभरात शहरातील तापमान प्रचंड प्रमाणात वाढले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागात हे तापमान ४२.२ एवढे नोंदवण्यात आले आहे. शहरात मात्र अधिकच्या तापमानाची नोंद आहे. गेल्या दोन दिवसांपासून परभणीचे तापमान ४३ अंशांपर्यंत जाऊन पोहोचले आहे.

दरम्यान शेतात कडबा बांधण्याचे काम करीत असताना ऊन लागून भोवळ आल्यामुळे रंगनाथ रानबा पवनवार (वय ६०) या शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील उमरी या गावात घडली. याप्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तीन दिवसात उष्माघाताचा तडाखा बसू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. दुपारी बारा ते चार या वेळेत शारीरिक कष्टाची आणि उन्हातली कामे टाळावीत. घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी अथवा मोठा हात रुमाल वापरावा. भरपूर थंड पाणी प्यावे असे विविध उपाय आरोग्य विभागाच्या वतीने सांगितले जात आहेत.

दरम्यान वाढत्या उन्हाचा परिणाम शहरातल्या रहदारीवर जाणवत असल्याने रस्त्यांवर भर दुपारी शुकशुकाट दिसत आहे. ग्रामीण भागात मात्र मोठ्या प्रमाणात या दिवसात विवाह सोहळ्यांचे आयोजन होत असल्याने खेड्यापाड्यात उन्हाची झळ जास्त जाणवत आहे.