परभणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारी (दि.6) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते प्रवेश करत आहेत. श्री. कदम हे खासदार संजय जाधव यांचे कट्टर समर्थक मानले जातात. बाळासाहेबांचे शिवसेना या पक्षात श्री. कदम हे प्रवेश करणार असल्याची चर्चा केल्या अनेक दिवसांपासून होती त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना असा प्रवास असलेले कदम हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत रमले होते. पूर्णा या शहराचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हाप्रमुख म्हणून अनेक वर्षांपासून ते आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कदम हे सत्ताधारी पक्षात दाखल होण्याच्या मन:स्थितीत गेल्या अनेक दिवसांपासून होते. त्यांच्या पक्षप्रवेशावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
नांदेड येथील बाजार समितीच्या मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. यावेळी श्री. कदम यांनी आपल्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त साधला असून कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या- त्या ठिकाणचे स्थानिक नेते हे विरोधी पक्षात राहण्याऐवजी सत्ताधारी पक्षाकडे जाण्यास आसुसल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच अजीत पवारांच्या राष्ट्रवादीत जिंतूर मतदार संघातील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी पालिका व जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रवेश केला. कदम यांचा पक्षप्रवेशही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच होत आहे. पूर्णा या शहरावर श्री. कदम यांचे वर्चस्व आहे. दीर्घकाळापासून ते या शहराचे राजकारण करतात. ‘मशाली’ला सोडचिठ्ठी देत त्यांनी आता धनुष्यबाण हाती घेतला आहे.