शिवसेना ( ठाकरे गट ) परभणीचे खासदार गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवरून संजय उर्फ बंडू जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. अडीच वर्षाच्या कार्यकाळात आम्हाला सत्तेचा लाभ झाला नाही. उद्धव ठाकरेंनी पक्षसंघटनेकडे स्वत:ही लक्ष दिलं नाही. अन्य कोणाला अधिकारीही दिले नाही. त्यामुळे आमच्यावर हा प्रसंग ओढावला, अशी खंत बंडू जाधव यांनी व्यक्त केली होती. अशातच आता बंडू जाधव यांनी मोठं विधान केलं आहे.

“ज्या दिवशी पक्षाशी विद्रोह करू, बेईमानी करू तेव्हा आमच्या रक्तात दोष आहे, असं गृहीत धरा. कारण, ज्या पक्षाने आपल्याला वाढवलं, त्याच्याशी पाईक राहणं आपलं कर्तव्य आहे,” असं बंडू जाधव यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “खेडमधील सभेचा शिवसेनेला नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला…” चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

एका कार्यक्रमात बोलताना बंडू जाधव म्हणाले की, “एका सामान्य परिवारातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मी मुलगा आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमुळे आमदार, मार्केट कमिटी, खासदार या सर्व पदांवर काम करण्याचं भाग्य मिळालं. हा जन्म काय, सात जन्म पक्षाचे उपकार फेडू शकणार नाही, एवढं दिलं आहे. त्यामुळे पन्नास खोके काय, शंभर खोके आले तरी माझ्या उंचीसमोर खूप ठेंगणं वाटतात.”

“पैसे कधी कामी येणार नाहीत. झुनझूवाला ६० हजार कोटींचे मालक होते. दोन सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. काय घेऊन गेलात? मग हे सुद्धा घेऊन जाणार आहेत का? त्यामुळे ज्या दिवशी पक्षाशी विद्रोह करू, बेईमानी करू, तेव्हा आमच्या रक्तात दोष असल्याचं गृहीत धरा. कारण, ज्या पक्षाने आपल्याला वाढवलं. त्याच्याशी पाईक राहणं आमचं कर्तव्य आहे,” असं बंडू जाधव यांनी सांगितलं.

हेही वाचा : “उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा, पण…”, २०२४ च्या निवडणुकीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

“पोराला मंत्री व्हायचं होतं, तर तुम्ही…”

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एका बोलताना बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले होते. “तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर पोराला मंत्री करायला पाहिजे नव्हतं. पोराला मंत्री व्हायचं होतं, तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होतं. तुम्ही खुर्ची आटवल्याने ह्यांना वाटलं उद्या बाप गेल्यावर पोरगं माझ्या बोकांडी बसेल. त्याच्यापेक्षा वेगळी चुल मांडली, तर काय बिघडलं. आणि याच भूमिकेतून ही गद्दारी झाली,” असे बंडू जाधव म्हणाले होते.

Story img Loader