Parbhani violence Updates : परभणी येथे १० डिसेंबर रोजी हिंसाचार झाला होता. त्यानंतर या प्रकरणी परभणी पोलिसांनी अटक केलेल्या ३५ वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा रविवारी परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. परभणी रेल्वे स्थानकाबाहेर भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची कथित विटंबना केल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर परभणी पोलिसांनी अटक केलेल्या ५० जणांपैकी मृत सोमनाथ सूर्यवंशी एक होता. दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या कोठडीतील मृत्यूनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये आमदार आव्हाड म्हणाले की, “परभणी येथील आंबेडकरी आंदोलक असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतला. कायद्याचे शिक्षण घेणारा हा तरुण “न्यायालयीन कोठडीत” असताना मरण पावतो, ही अजूनच गंभीर बाब आहे. तो मेला का त्याला मारण्यात आले, हे पोस्टमार्टम झाल्यावर समजेल…पण एक समाज म्हणून आपल्या समोर तोच प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो…असे अजून किती सोमनाथ आपला जीव गमावणार आहेत..?”

सोमनाथ सूर्यवंशीबरोबर काय घडलं?

१० डिसेंबर रोजी सोपान पवार या व्यक्तीने संविधानाच्या प्रतिकृतीची कथितपणे विटंबना केली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी निदर्शने आणि दगडफेक झाली. परभणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून सोमनाथ सूर्यवंशी याच्यासह ५० जणांना अटक केली होती. सूर्यवशीला १२ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आणि १४ डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. त्यानंतर छातीत दुखू लागल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांवर आरोप

स्थानिकांनी असा आरोप केला की, पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात काम करणाऱ्या वचला मानवते नावाच्या महिलेला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. असे असले तरी पोलिसांनी हे आरोप नाकारले आहेत. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

हिंसाचारानंतर लगेचच दलित वस्त्यांमध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केल्याचा आरोपही करण्यात येत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कायद्यानुसार आरोपांची चौकशी केली जाईल आणि कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.

हे ही वाचा : महायुतीचे पाच आमदार असूनही सोलापूरला मंत्रिपदाची हुलकावणी

प्रकाश आंबेडकरांकडून संताप

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणी एक्सवर पोस्ट केली आहे. आपोल्या पोस्टमध्ये आंबेडकर म्हणाले की, “परभणीत सोमनाथ सुर्यवंशी या भीमसैनिकाचा कोठडीत मृत्यू झाला आहे. त्याचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्याचा मृत्यू झाला यापेक्षा असह्य काय असू शकते.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parbhani violence somnath suryavanshi judicial custody death maharashtra jitendra awhad aam