पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीच्या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही लक्ष घातले असून, ही बदली करू नये, अशी मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविले आहे. ‘राजकीय दबावाला बळी पडून ही बदली करू नये. ही बदली झाल्यास लोक रस्त्यावर येतील व प्रसंगी मीही यासाठीच्या आंदोलनात उतरून जनतेच्या, न्यायाच्या बाजूने लढेन. चांगले अधिकारी समाजाची संपत्ती आहेत. त्यादृष्टीने वेळ पडल्यास या लोकलढय़ाचे नेतृत्व मी स्वत: करीन’, असा सज्जड इशारा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.
परदेशी यांच्या संभाव्य बदलीला सध्या मोठा विरोध होत आहे. बदलीच्या विरोधात विविध संघटनांकडून आंदोलनेही करण्यात येत आहेत.
या प्रकरणात लक्ष घालण्याच्या मागणीसाठी काही नागरिकांनी हजारे यांची भेटही घेतली होती. त्यानुसार परदेशी यांची बदली होऊ नये, यासाठी हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. परदेशी यांनी आपला विहित पदकाळ पूर्ण केलेला नसताना व त्यांची कुठलीही तक्रार झालेली नसताना काही हितसंबंधी राजकारणी त्यांची बदली करण्याच्या प्रयत्नात आहेत. कदाचित परदेशी स्वच्छ व पारदर्शक कारभार करत असल्याने, भ्रष्टाचाराला लगाम घालत असल्याने या मंडळींचे आर्थिक हितसंबंध धोक्यात आले असावेत. तथापि हे कायद्याचे राज्य असल्याने झुंडशाहीने नव्हे, तर कायद्याचे पूर्ण पालन करूनच सरकारने आपला ‘शासनधर्म’ पाळला पाहिजे, अशी अपेक्षा आहे, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभाकर देशमुखांवर
कारवाई का नाही?
राज्यातील चांगल्या अधिकाऱ्यांचे नीतिधैर्य वाढविणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. अन्यथा, चांगली माणसे प्रशासनापासून फारकत घेऊन अन्य ठिकाणी नोकरी करतील. एकीकडे पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या जांभे येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या विषयी सध्या दररोज बातम्या येत असताना, लवासासारख्या प्रकल्पाला मान्यता देण्यात त्यांनी तत्परता दाखविलेली असताना, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाल्याचे दिसत नाही. याउलट परदेशी यांच्यासारख्या प्रामाणिक व स्वच्छ अधिकाऱ्यावर मात्र अकाली आणि अकारण बदलीचा घाट घातला जातो, हे योग्य नाही, असेही हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pardeshis transfer sparks off protests in pimpri chinchwad