असे म्हणतात की गुन्हेगारांना जात नसते, मात्र समाजात अशी एक जात आहे ज्यांच्याकडे नेहमीच संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं. हाच संशयाचा डाग पुसून टाकण्यासाठी बीडमधील शिरूरमध्ये पारधी समाजातील एका तरुणानं समाजात सन्मानान जगता यावं, म्हणून एक मोठा निर्णय घेतल्याची घटना समोर आलीय. या तरुणाने पारधी समाजावर मारलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी आणि तो गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्यासाठी थेट आपल्या घराला सीसीटीव्हीच बसवले आहेत.
चारही बाजूने ओसाड डोंगर आणि त्यामध्ये असणार हे घर एखाद्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य अथवा एखाद्या प्रतिष्ठित माणसाचे नाही, तर हे घर आहे एका पारधी कुटुंबाचं, गावात अथवा परिसरात एखादी गुन्हेगारी घटना घडली की सर्वात आधी याच कुटुंबाला लक्ष्य केलं जातं. मात्र आपण त्या गुन्ह्यात सहभागी नसून निर्दोष आहोत, असं सिद्ध करण्यासाठी या कुटुंबातील शामल काळे या मुलाने घराच्या चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत.
शामल काळे म्हणाले, “बीड, औरंगाबाद, नगर जिल्ह्यातील पोलीस मला त्रास देतात. मी कोठे जातो, परत घरी केव्हा येतो हे विचारतात. माझ्यावर गुन्हा दाखल करायचा आहे असं घरी आईला सांगतात. माझ्या आजोबा पंजोबांवर जो गुन्हेगारांचा शिक्का आहे तोच गुन्हेगाराचा शिक्का पोलीस माझ्यावर मारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच मी घराला सीसीटीव्ही लावले आहेत.”
शामलची पत्नी अर्चना काळे म्हणाल्या, “इकडले तिकडले पोलीस येतात आणि माझ्या नवऱ्याला गुन्हेगार असल्याचं म्हणत गुन्हा नोंदवायचा आहे असं सांगतात. म्हणून आम्ही गुन्हेगार नाहीत पोलिसांसमोर सिद्ध करण्यासाठी आम्ही घराला सीसीटीव्ही बसवले आहेत.”
काळे कुटुंब थोडीफार असलेली शेती कसून आपला उदरनिर्वाह करतं. शामल हा शिरूर इथल्या एका शाळेत दहावीच शिक्षण घेत आहे. त्याची शिक्षणाची मोठी जिद्द, चांगलं शिक्षण घेऊन मोठा अधिकारी बनण्याचं स्वप्न तो उराशी बाळगून आहे. मात्र, वारंवार ज्या गुन्ह्यात सहभाग नाही, त्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने हे कुटुंब पुरते हतबल झाले आहे.
एखाद्या पारधी समाजाच्या घरावर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे ही राज्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल. आम्हाला देखील समाजात इतरांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्यावर होणारा अन्याय सिद्ध करण्यासाठी उचललेलं हे पाऊल असल्याचं भटके विमुक्त संघटनेचे समन्वयक अरुण जाधव यांनी सांगितलं.
अरुण जाधव म्हणाले, “इंग्रजांच्या काळात ज्या जातींनी इंग्रजांविरोधात बंड केला, इंग्रजांचे रितीरिवाज मान्य केले नाही, इंग्रजांच्या कायद्याविरोधात उठाव केला त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारण्यात आला. शिरूरच्या या आदिवासी पारधी कुटुंबाने मी गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या घराला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.”
“काळे कुटुंबाने आपल्या घराला ४ कॅमेरे बसवलेत. एक कॅमेरा समोरच्या दरवाजाला आहे, दुसरा घराच्या मागच्या बाजूला, तिसरा घराच्या चौकटीला आणि चौथा घराच्या एका बाजूने लावला आहे. त्यामुळे आता या कुटुंबाला ते गुन्हेगार नाहीत हे सिद्ध करण्यासाठी कोणा वकिलाची गरज नाही. हे कुटुंब गुन्हेगार, चोर आहे की नाहीत, या कुटुंबातील सदस्य दिवसा आणि रात्री कोठे जातात हे सीसीटीव्ही सिद्ध करेल,” असं अरुण जाधव यांनी सांगितलं.
“यानंतरही या कुटुंबाला अडचणी आल्या तर आम्ही हे सीसीटीव्ही फुटेज शासनाच्या समोर ठेऊ. त्यानंतर कॅमेरे बसवूनही पोलीस आम्हाला त्रास देतात हे आम्ही शासनाला सांगू. आम्हाला माणूस म्हणून जगायचं आहे, माणसात यायचं आहे,” असंही जाधव यांनी नमूद केलं.
या कुटुंबाप्रमाणेच समाजात असे अनेक कुटुंबं आहेत जे गुन्हेगारी शिक्का मारल्यामुळे अडकून पडले आहेत. त्यामुळेच समाजाने देखील आपला दृष्टिकोन बदलून या घटकाला स्वीकारणे गरजेचे आहे.