साईबाबा संस्थानच्या इंग्रजी माध्यम शाळेत प्रवेशासाठी पालकांची झुंबड उडाली आहे. मात्र दोन दिवस होऊनही अर्ज न मिळाल्याने आता पालकांनी शाळेसमोर उपोषण सुरू केले आहे.
या शाळेत १२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार तेवढेच प्रवेशअर्ज देण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला. गेले चार दिवस रोज तीसच अर्जाची विक्री सुरू होती. हे अर्ज मिळणे म्हणजेच प्रवेश मिळाल्यासारखे असल्याने पालक दोन दिवसांपासून शाळेसमोर रांगा लावून बसले होते. दुपारी तीन वाजता अर्जविक्री सुरू केल्यानंतर अर्ज मिळाला नाही, तर पालक दुसऱ्या दिवसासाठी तसेच रांगेत बसून राहतात. त्यामुळे गेले चार दिवस येथे पालकांचा मुक्कामच पडला आहे.
गुरुवारी दुपारनंतर माजी नगराध्यक्ष कैलास कोते, साई निर्माणचे अध्यक्ष विजय कोते, शिवसेनेचे अभय शेळके, शिवराज्य पक्षाचे सचिन चौगुले यांच्यासह जवळपास १०० वर ग्रामस्थ उर्वरित विद्यार्थ्यांनाही शाळेत प्रवेश मिळावा या मागणीसाठी शाळेसमोर उपोषणास बसले होते. संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन व्यवस्थापन समितीशी चर्चा करून चार-पाच दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, मात्र या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत तोडगा निघाला नव्हता.
शाळेला जागेची अडचण आहे. व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार १२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शाळेने प्रवेश प्रक्रिया राबविली. मात्र उर्वरित व शिर्डी हद्दीबाहेरील विद्यार्थ्यांना वयाच्या अटीत शिथिलता ठेवून प्रवेश द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यावर व्यावस्थापन व वरिष्ठांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे उपकार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा