पंढरपूर तालक्यातील राष्ट्रवादीचे नेते तथा एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांनी स्वत:च्या गटाचे अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी भाजपच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वाट धरली. यात त्यांची अवस्था चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत चक्रव्यूह भेदणार का, याबद्दल राजकीय जाणकारातही उत्सुकता आहे.
मागील २००९ साली राष्ट्रवादीचे नेते, माढय़ाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत उभे होते. त्यात त्यांचा पराभव झाला. परंतु तोपर्यंत पंढरपूर भागात वर्चस्व टिकवून राहिलेले परिचारक गटाचीही ताकद हळूहळू नाहीशी होत गेली. स्वत: परिचारक हे एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर राजकारणातूनही जवळपास दूर होत गेले. त्यांच्या गटाची सूत्रे त्यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांनी घेतली. त्या वेळी सुरुवातीला पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रशांत परिचारक यांना अपयश पत्करावे लागले होते. तर दुसरीकडे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही परिचारक गटाचे महत्त्व कमी कमी होत गेल्यानंतर परिचारकांपुढे स्वत:च्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.
या पाश्र्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून प्रशांत परिचारक हे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात होते. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्याही संपर्कात होते. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आरूढ होताच दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यामुळे परिचारक यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होत नव्हता. अखेर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमध्ये पंढरपूर-मंगळवेढय़ाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जाणार असल्याचे हेरून प्रशांत परिचारक यांना स्वाभिमानीत पाठविण्याची व्यवस्था केली. तत्पूर्वी, परिचारक यांचे कट्टर विरोधक अपक्ष आमदार भारत भालके यांनीही काळाची पावले ओळखून महायुतीकडे जाणारा रस्ता साफ करण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यासाठी त्यांनी आपल्या काही अनुयायांना शिवसेनेत पाठविले होते. स्वत:ची जागा सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कडवा विरोध होता. कारण मागील विधानसभा निवडणुकीत आमदार भालके हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रिडालोसतर्फे उभे राहिले व निवडून आले होते. नंतर त्यांनी स्वाभिमानीकडे पाठ फिरवून सत्ताधारी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. त्याचा राग आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला येणे क्रमप्राप्त होते. त्यातूनच प्रशांत परिचारक यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जायचा रस्ता मोकळा झाला. दोन वर्षांपूर्वी पंढरपूर भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस आंदोलन झाले, तेव्हा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर सम्राट म्हणून परिचारक यांनाही लक्ष्य बनविले होते. त्या वेळी झालेल्या हिंसक आंदोलनात परिचारक यांच्या कारखान्याची मोडतोड केली म्हणून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना आठ-दहा दिवस पोलीस कोठडीत राहावे लागले होते. परंतु आता हे झाले गेले विसरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परिचारक यांना जवळ केले आहे. तर परिचारक यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा रोष ओढवून घेतला आहे. या परिस्थितीत मराठा प्रभाव असलेल्या पट्टय़ात परिचारक गटाचे अस्तित्व अबाधित राहणार काय, विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळणार काय, याची उत्तरे येत्या दीड-दोन महिन्यांतच स्पष्ट होणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा