लोकसभेला स्वराज्य पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती होणार होती. तसेच कोल्हापूरची जागा स्वराज्य पक्षाला देणार असा शब्द मला काँग्रेसच्या पक्षश्रेष्टींनी दिला होता. पण अचानक छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी पुढे आली. त्यामुळे आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला, अशी स्पष्टोक्ती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. तसेच शाहू महाराज निवडून आल्यानंतर माझा आणि महाविकास आघाडीचा विषय संपला, असेही ते म्हणाले. संभाजीराजे छत्रपतींच्या या विधानांनंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

आज परिवर्तन महाशक्ती आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी शाहू महाराज काँग्रेसचे खासदार असताना संभाजीराजेंनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेबाबत त्यांना प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यासंदर्भात बोलताना, “ज्यावेळी शाहू महाराज निवडून आले, त्या दिवशी माझा आणि महाविकास आघाडीचा विषय संपला”, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

हेही वाचा – Maharashtra News : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

“स्वराज्य पक्षाची चळवळ शाहू छत्रपती हे खासदार व्हायच्या आधी सुरू झाली होती. लोकसभेला स्वराज्य पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती होणार होती. तसेच कोल्हापूरची जागा स्वराज्य पक्षाला देणार असा शब्द मला काँग्रेसच्या पक्षश्रेष्टींनी दिला होता. पण काही कारणास्तव छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी पुढे आली. त्यामुळे माझ्यासमोरील सर्व विषय संपले. शाहू महाराजांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली तेव्हा एक मुलगा म्हणून मी माझी जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. ज्यावेळी शाहू महाराज निवडून आले, त्यादिवशी माझा आणि महाविकास आघाडीचा विषय संपला”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

पुढे बोलताना, “शाहू छत्रपती निवडून आल्यानंतर मी महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात शाहू महाराज यांच्या सत्काराचे कार्यक्रम पार पडले. पण काँग्रेसच्या नेत्यांनी मला बोलवलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा आणि माझा विषय तेव्हाच संपला होता. मलाही माझं स्वातंत्र आहे. शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन मी वाटचाल करतो आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं, त्याप्रमाणे आता आम्ही काही कार्यकर्त्यांना घेऊन स्वराज्य पक्ष मोठा करतो आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.