स्वत:चे घर किंवा ब्लॉकचे सर्वसामान्यांचे स्वप्न अधुरेच राहणार आहे. राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने चटई क्षेत्रात १५ टक्के वाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा बिल्डर्स लॉबीच्या फायद्याचाच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सिमेंट काँक्रिटचे जंगल वाढत असताना पार्किंग व सांडपाणी व्यवस्थापनकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पर्यटन जिल्ह्य़ात येणारा पर्यटक त्रस्त होत आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत नगरपालिका कार्यक्षेत्रात बांधकामांना १५ टक्के वाढीव चटई क्षेत्र मिळणार आहे. त्यामुळे घरांच्या किमती घटणार आहेत, असे म्हटले असले तरी त्यात तथ्य नाही.
मात्र बिल्डर्स लॉबीला त्याचा फायदा होईल तसेच इमारतीचा तिसरा मजला बांधण्यासाठी मुंबई किंवा पुण्याला धाव घ्यावी लागणार नाही. पूर्वी ग्राऊंड प्लस तीन मजले उभारण्यासाठी परवानगी होती. आता नव्या नियमाच्या संमतीनंतर ग्राऊंड प्लस तीन मजले उभारण्यास परवानगी मिळेल असे सांगण्यात येत आहे. नव्या निर्णयामुळे तिसरा मजल्याच्या परवानगीसाठी मुंबई किंवा पुण्याला जावे लागणार नाही.
जमिनीचा वाढता भाव तसेच वाळू, खडी, चिरा, वीटा, लोखंड अशा इमारतीला लागणाऱ्या वस्तूंचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे १५ टक्के चटई क्षेत्राचा फायदा बिल्डर्सना अधिक होईल. सर्वसामान्य माणसाला घर बांधणे शक्यच होणार नाही. सरकारने निवारा देण्यासाठी आणखी काही निर्णय घेण्याची गरज आहे.
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊन काही वर्षे उलटली पण पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते सुस्थितीत नाहीत, तसेच जिल्ह्य़ात एकही सर्व पायाभूत सुविधायुक्त पर्यटन स्पष्ट नाही. मात्र इमारत बांधकाम धंदा तेजीत आहे.
कोकणच्या निसर्गसौंदर्याने सर्वानाच अचंबित करून टाकले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाला वाटते. सिंधुदुर्गात इमारत बांधकाम व्यवसाय तेजीत आहे, पण त्याचा फायदा सर्वसामान्याला मिळणे शक्य नाही.
सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण व कणकवली या शहरांतील नगरपालिका व अन्य शहरांत ग्रामपंचायती कार्यरत आहेत. त्या ठिकाणी झपाटय़ाने इमारत बांधकाम व्यवसाय वाढलेला आहे. हा व्यवसाय वाढतच असताना सांडपाणी व्यवस्थापन तसेच रस्ते व पार्किंग व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवत आहे.
नगरपालिका क्षेत्रात चटई क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण एखाद्या इमारतीच्या फ्लॅटप्रमाणे वाहन पार्किंग व्यवस्थापन करणार किंवा कसे? असा प्रश्न निर्माण होतो. आज वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. पण वाहन पार्किंग व्यवस्थापन नसल्याने सर्वच शहरांवर वाहतुकीचा ताण पडत आहे.
नगरविकास खात्याने चटई क्षेत्रात वाढ करताना वाहन पार्किंग व्यवस्था तसेच रस्ते सुविधा बाबत गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आज नव्याने इमारती बांधल्या जात आहेत. पण तेथे आपत्कालीन यंत्रणेतील अग्निशामक बंब जाण्यासाठीही रस्ता नाही. दाटी-वाटीत झालेल्या इमारतीमुळे शहरांचे सौंदर्य बिघडतानाच सिमेंट काँक्रिटच्या जंगलामुळे आपत्ती व्यवस्थापनही कोलमोडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातील नगरपालिका विकास व नियमाला प्राधान्य देतात, शहराचा विस्तार वाढवून महापालिकात रूपांतर केले जावे अशी मागणी आहे.
सिंधुदुर्गात पार्किंग व सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष
स्वत:चे घर किंवा ब्लॉकचे सर्वसामान्यांचे स्वप्न अधुरेच राहणार आहे. राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने चटई क्षेत्रात १५ टक्के वाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा बिल्डर्स लॉबीच्या फायद्याचाच आहे.
First published on: 22-10-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parking and sewer water management ignore in sindhudurg