Parliament Security Breach : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना काल (दि. १३ डिसेंबर) लोकसभा सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन अज्ञात तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या घेतल्या. खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत हे दोघे लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. यावेळी त्यांनी स्मोक कॅन सभागृहात फोडले. त्याचदरम्यान संसदेच्या बाहेरही दोन जणांनी स्मोक कॅन फोडत घोषणाबाजी केली. संसदेत घुसखोरी करणाऱ्या दोन तरुणांची नावे सागर शर्मा आणि डी. मनोरंजन (३५) अशी आहेत. तर संसदेबाहेर नीलम (४२) आणि अमोल शिंदे (२५) या दोघांनी स्मोक कॅन फोडून घोषणाबाजी केली. यापैकी अमोल शिंदे हा लातूरचा राहणारा असून तो आई-वडिलांना पोलिस भरतीसाठी दिल्लीला चाललो असे सांगून निघाला होता.
कोण आहे अमोल शिंदे?
अमोल धनराज शिंदे नावाचा तरुण हा लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील नवकुंडाची झरी गावचा रहिवासी आहे. झरीतील बसस्थानकाच्या नजीकच्या वस्तीत त्याचे घर असून वडील गावातीलच एका धार्मिक संस्थानात साफसफाई व इतरवेळी मोलमजुरी करतात. आई गृहिणी व देवीच्या वारी जोगवा मागते. तर दोन भाऊ व दोन विवाहित बहिणी आहेत. शिंदे हा सोयाबीनचे गुत्ते घेण्याचे काम करतो. हेच काम त्याने दोन दिवसांपूर्वीच घेतले होते व त्यानंतर तो गावातून गेला होता, अशी माहिती झरी गावातील एका व्यक्तीकडून मिळाली.
हे वाचा >> लोकसभा घुसखोरी प्रकरणी राजनाथ सिंह यांचं निवेदन; म्हणाले, “कुणालाही पास देताना…!”
भरतीसाठी चाललो सांगून गेला
अमोल शिंदेला दिल्लीत ताब्यात घेतल्यानंतर इथे महाराष्ट्रातले पोलिस लातूरमधील त्याच्या घरी पोहोचले. आई-वडिलांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अमोलच्या आईने सांगितले, “अमोलला सैनिक किंवा पोलिस दलात भरती व्हायचे होते. त्याला भरतीची अपेक्षा होती. तो सारखा म्हणायचा, मला नोकरी लागली नाही. एवढे शिकलो पण काही फायदा झाला नाही. आम्ही त्याला म्हणायचो खूप कंपन्या आहेत, कुठंही नोकरी लागेल. पण त्याला सैन्यातच भरती व्हायचं होतं. तो म्हणायचा, आयुष्यभर कंपन्यातच नोकरी करायची आहे. पण मला सैन्यात जायचंय. शाळेत असल्यापासून अमोल हुशार होता, त्याचा नेहमी पहिला नंबर यायचा. त्याने दिल्लीत काय केलं, याबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही. पोलिस घरी आल्यावर आम्हाला कळलं की, दिल्लीत काहीतरी झालं.”
अमोलचे वडील धनराज शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “आमच्या मुलाने काही चोरी नाही केली. जगला-वाचला तर येईल घरी. इथे रोज रेती-सिमेंटच्या कामाला जात होता. रोजगार नव्हता म्हणून तो वैतागला होता. ९ तारखेला पोलिस सैन्यभरतीला दिल्लीला जायचंय असं सांगून तो निघाला. आम्ही रोजंदारी करतो, त्यामुळं नोकरी लावण्यासाठी आम्ही कुठून पैसे देणार. काल पोलिसांनी आम्हाला घडलेला प्रकार सांगितला, आम्ही पोलिसांना तो जिवंत आहे का? एवढाच प्रश्न विचारला.”
आणखी वाचा >> Parliament Attack: आरोपी सागर शर्मा दिल्लीला पोहचण्याआधी आईला म्हणाला होता, “मी आता…….
असीम सरोदे अमोलचे वकीलपत्र घेणार
दरम्यान वकील असीम सरोदे यांनी अमोल शिंदेचे वकीलपत्र घेणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून याबाबतची माहिती दिली. “अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार. अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. अमोल चा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा त्याला मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे. आणि त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी असे मला वाटते”, अशी पोस्ट असीम सरोदे यांनी टाकली आहे.