हिवाळी अधिवेशनाची पूर्ण तयारी झाली असून येत्या १० डिसेंबरपासून नागपूर येथे हे अधिवेशन सुरू होणार आहे. विरोधकांनी कामकाज बंद न पाडता जास्तीत जास्त वेळ कामकाज सुरू ठेवून प्रश्न मार्गी लावण्यावर भर द्यावा, असे आवाहन संसदीय कामकाज व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत
केले.
पाटील म्हणाले, की संसदीय कामाची तयारी पूर्ण झाली आहे. ९ डिसेंबरला विरोधकांना चहापाण्यास बोलावण्यात येणार आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी दोन आठवडय़ांचा असून अधिवेशनात अकरा विधेयके चर्चेला येणार आहेत. पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, बाबासाहेब कुपेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. या अधिवेशनात सेल्फ युनिव्हर्सिटी, ग्रामपंचायत जातपडताळणी, नगरविकास खात्यांसंदर्भातील दोन विधेयके, ९७ व्या घटनादुरुस्तीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर विदर्भातील प्रश्नांवर चर्चा व राज्यातील महत्त्वाचे विषय हाती घेतले जातील. अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक दूर करून समाजकल्याण विभागास हे विधेयक अधिवेशनात मांडण्यास सांगण्यात आले आहे.    

Story img Loader