सावंतवाडी : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला तिसरा संशयित आरोपी परमेश्वर रामनरेश यादव (रा. मिर्झापूर उत्तरप्रदेश) याची आज पोलीस कोठडी संपल्याने त्याला मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालवणात साजऱ्या झालेल्या नौदल दिननिमित्त राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे ४ डिसेंबर २०२३ रोजी अनावरण झाल्यावर अवघ्या आठ महिन्यांनंतर २६ ऑगस्ट २०२४ रोजी हा पुतळा कोसळला होता. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मालवण पोलिसांनी पुतळ्याचा शिल्पकार संशयित जयदीप आपटे व बांधकाम सल्लागार संशयित चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. सध्या हे दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात अधिक तपास करत असताना पोलिसांनी या पुतळ्याचे वेल्डिंग करणाऱ्या परमेश्वर यादव या तिसऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज पोलीस कोठडी संपल्याने त्याला मालवण न्यायालयात हजर करण्यात आले.

हेही वाचा – नारायण राणेंच्या खासदारकीला आव्हानाचे प्रकरण : जप्त मतदान यंत्र पुन्हा निवडणूक आयोगाच्या ताब्यात

हेही वाचा – रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासण्या उपलब्ध नसल्यास कारवाई अयोग्य, जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांवरील आरोपाबाबात समितीचा अहवाल

यावेळी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडताना शिल्पकार जयदीप आपटे याने परमेश्वर यादव याला सब कॉन्ट्रॅक्ट दिले होते याचा तपास करणे, यादव याला कामाचे किती पैसे मिळाले, यादव याच्याकडे वेल्डिंग कामाचे शिक्षण घेतल्याचा डिप्लोमा सर्टिफिकेट आहे का? याचा तपास करण्यासाठी यादव याला आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. तर संशयित यादव याच्यातर्फे अ‍ॅड. अक्षय सामंत यांनी बाजू मांडत पुतळ्याचे डिझाईन व कास्टिंगचे काम व उभारणीचे काम शिल्पकार जयदीप आपटे याच्या निगराणीखाली झाले असून परमेश्वर यादव याने त्याला नेमून दिलेले काम केले आहे, त्यामुळे पुतळ्याच्या कामास आपटे जबाबदार असल्याने यादव याच्यावर कारवाई होणे चुकीचे असल्याचे सांगितले. तर पोलीस अधिकारी आढाव यांनी पुतळ्यासाठी केलेले धातूचे जोडकाम हे कमकुवत आढळल्याने त्यादृष्टीने तपास करताना वेल्डिंग करणाऱ्या यादव याला अटक केली असून अधिक तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी केली. सर्व युक्तिवाद व सुनावणीअंती न्यायाधीश देवकते यांनी परमेश्वर यादव याला २५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parmeshwar yadav the third accused in shivaji maharaj statue in malvan rajkot fort tragedy has been remanded in judicial custody till october 25 ssb