राजस्थानमध्ये सुरू असलेल्या लष्करी सरावादरम्यान झालेल्या अपघातात तालुक्यातील रांधे येथील योगेश विनायक काटे हा जवान (वय २६) गुरुवारी सकाळी दहा वाजता शहीद झाला.
आग्रा येथील लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये नर्सिग असिस्टंट म्हणून काम करणारा योगेश राजस्थानमधील भानपूर सेक्टर येथे पॅराडॉपिंग सरावासाठी गेला होता. आकाशातून सोडल्यानंतर पॅराशूटच्या बलूनची गाठ न सुटल्याने योगेश आकाशातून खाली कोसळला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
बारावीनंतर सन २००८ मध्ये योगेश लष्करात भरती झाला होता. नंतरही त्याने त्याचे शिक्षण सुरूच ठेवले होते. अळकुटी येथील प्रवरा महाविद्यालयात एस.वाय.बी.ए.ची परीक्षा तो बाहेरून देत होता. येत्या दि. १८ला तो परीक्षेसाठी गावाकडे येणार होता. परीक्षेनंतर लग्न करण्याचाही त्याचा तसेच त्याच्या कुटुंबीयांचा बेत होता. परंतु हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली. शनिवारी योगेश याचा मृतदेह रांधे येथे आणण्यात येणार असून सकाळी नऊ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Story img Loader